कडवई-तुरळ रिक्षा संघटनेचे बांधकाम विभागासमोर ठिय्या आंदोलन
रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने संघटना आक्रमक
संगमेश्वर : (सचिन यादव )
संगमेश्वर तालुक्यातील कडवई चिखली रस्त्याच्या दुरुस्ती कामासाठी रिक्षा मालक चालक संघटना कडवई तुरळ चिखली यांच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागास ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता .मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाल्याने गुरुवार दिनांक १९ मेपासून रिक्षा संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देवरुख कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनास सुरवात करण्यात आली आहे .
कडवई चिखली रस्त्याची दुरावस्था झाली असून गेली तीन वर्षे या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे . या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीवर प्रतिवर्षी लाखोंची उधळण केली जाते मात्र प्रत्यक्षात काम केले जात नसून फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप रिक्षा संघटना अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांनी केला आहे .
या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी रिक्षा संघटनेच्या वतीने गेली दोन वर्षे पाठपुरावा केला जात आहे . मात्र निद्रिस्त असणाऱ्या बांधकाम विभागाकडून याकडे जाणीवपूर्वकच दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते .अखेर रिक्षा संघटनेच्या वतीने ९ मे रोजीच्या पत्रांतून १९ मे रोजी ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता .मात्र १९ मे पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही न केल्याने अखेर रिक्षा संघटनेच्या वतीने आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला .
१९ मे रोजी जिल्हापरिषद सदस्य संतोष थेराडे यांनी मध्यस्थि केल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहायक कार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांनी सदर रस्त्यावर वार्षिक देखभाल व दुरुस्ती कार्यक्रम अंतर्गत ३१.२५ लाखाचे काम मंजूर असून सध्या निविदा स्तरावर असल्याचे पत्र आंदोलनाच्या दिवशी दुपारी १२ वाजता संघटनेला व्हॉट्स ॲप वरून मेसेज पाठविल्याचे अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांनी संगीतले .मात्र हे पत्र समाधानकारक नसल्याने आपण ठिय्या आंदोलनास बसल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. जोपर्यंत रस्त्याचे काम सुरू होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असे अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांनी सांगितले .
रिक्षा संघटनेच्या या आंदोलनानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे .