खेडनजीक विद्युत वाहिनी तुटल्यानंतर दुसऱ्या दिवशीही वेळापत्रक विस्कळीतच
मडगाव-मुंबई तेजस एक्सप्रेस तीन तास १७ मिनिटे ‘लेट’
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर दिवाणखवटी ते विन्हेरे दरम्यान शुक्रवारी ओव्हरहेड विद्युत वाहिनी तुटून विस्कळीत झालेली रेल्वे सेवा सुरू झाली असली तरी शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी कोकण रेल्वे मार्गावरील काही गाड्या विलंबाने धावत होत्या.
शुक्रवारच्या घटनेमुळे कोकण रेल्वेला शनिवारी मुंबई ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या दोन एक्सप्रेस गाड्या विलंबाने चालवाव्या लागल्या. या संदर्भात कोकण रेल्वेकडून प्राप्त झालेल्या अधिकृत माहिती नुसार मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणारी (11100) ही गाडी दुपारी 12:45 ऐवजी सायंकाळी साडेचार वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस करता सोडावी लागली. निर्धारित वेळेपेक्षा ही तीन तास 45 मिनिटे उशिराने धावत होती.
याचबरोबर मडगाव ते मुंबई सीएसएमटी दरम्यान जाणारी तेजस एक्सप्रेस (22120) ही वातानुकूलित आलिशान एक्सप्रेस गाडी तिच्या निर्धारित दुपारी 3:15 ऐवजी सायंकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांनी मार्गस्थ करण्यात आली. त्यामुळे शुक्रवारी च्या घटनेनंतर शनिवारी देखील तेजस एक्सप्रेस दोन तास 35 विलंबासह धावत होती. दरम्यान शनिवारी रात्री साडेनऊ वाजेपर्यंतच्या स्थितीनुसार मडगाव ते सीएसएमटी दरम्यान धावणारी तेजस एक्सप्रेस प्रत्यक्षात तीन तास सोळा मिनिटे उशिराने धावत होती.
शुक्रवारी पहाटे दिवाणखवटी ते विन्हेरे या स्थानकां दरम्यान ओव्हरहेड विद्युत वाहिनी झालेल्या बिघाडामुळे सकाळी साडेसहा वाजेपर्यंत पडली होती. यामुळे शुक्रवारी अनेक गाड्या अडीच ते पाच तासांपर्यंत विलंबाने धावत होत्या.
शुक्रवारच्या घटने पाठोपाठ शनिवारी देखील कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या काही एक्सप्रेस गाड्यांना लेट मार्क लागला.