कोकण रेल्वे मार्गावरून डबल-डेकर एक्सप्रेस ३ नोव्हेंबरपासून गायब होणार
सुरेश प्रभुंनी आणली कोकण रेल्वेने गमावली!
रेक अन्य मार्गावर वळवण्याचा रेल्वेतील ‘बाबूं’चा डाव
रत्नागिरी : मागील आठ वर्षांपासून कोकण रेल्वे मार्गावर धावत असलेली डबल डेकर एक्सप्रेस गायब करण्यात रेल्वेतील ‘बाबू’ अखेर यशस्वी ठरले आहेत. आता ही गाडी नेमकी कोणत्या मार्गावर वळवली जाते, याचा शोध ‘कोरे’ प्रेमी रेल्वे अभ्यासकांकडून घेतला जात आहे. सध्या लोकमान्य टिळक टर्मिनस वरून रात्री सुटणाऱ्या डबल-डेकर एक्सप्रेसमध्ये विलीन करण्याच्या नावाखाली धोनी डबल डेकर एक्सप्रेस कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक संपताच 3 नोव्हेंबरपासून बंद केल्या जाणार आहेत.
कोकण रेल्वे मार्गावर आठ वर्षांपूर्वी डबल डेकर एक्सप्रेसची चाचणी यशस्वी झाल्यानंतर सुरुवातीला ती काही काळ ती विशेष डबल डेकर एक्सप्रेस म्हणून चालवण्यात आली. त्यानंतर या मार्गावर तिच्या फेऱ्या बंद करण्यात आल्या. बंद करण्यात आलेली डबलडेकर पुन्हा कोकण रेल्वे मार्गावर धावेल की नाही अशी स्थिती निर्माण झाली असतानाच कोकणचे सुपुत्र सुरेश प्रभू यांनी केंद्रात रेल्वे मंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर डिसेंबर 15 पासून डबल डेकर एक्सप्रेस मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान कायमस्वरूपी धावू लागली.
सुरेश प्रभू रेल्वे मंत्री होण्याआधी विशेष फेऱ्या करून कोकण रेल्वे मार्गावरून विसावलेली डबल डेकर एक्सप्रेस अन्यत्र वळविण्याचा डाव आखला जात होता. मात्र याच दरम्यान रेल्वेमंत्री पदाची सूत्रे कोकणचे सुपुत्र सुरेश प्रभू यांनी स्वीकारली आणि डिसेंबर 2015 मध्ये त्यांच्याच हस्ते मडगाव मधून मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनससाठी डबल-डेकर एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. तेव्हापासून जवळपास आठ वर्षे सेवा बजावल्यावर आता डबल डेकर एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावरून गायब करण्याचा घाट घातला जात आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगांव दरम्यान 11085 /11086 तसेच 11099/11100 या क्रमांकासह रेक शेअरींग करत एक रात्री तर दुसरी पहाटे अशी डबल डेकर एक्सप्रेस मुंबईहून कोकण रेल्वे मार्गावर धावत होती. मात्र यातील 11085/11086 ही गाडी 11 0 99 व 11100 या क्रमांकाच्या एक्सप्रेस गाडिमध्ये विलीन करून प्रत्यक्षात डबल डेकर एक्सप्रेस येत्या दिनांक 3 नोव्हेंबर पासून बंद केली जात आहे.
कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक 31 ऑक्टोबर रोजी संपत आहे. हे पावसाळी वेळापत्रक संपताच डबल डेकर एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावरून गायब होणार आहे. त्याऐवजी डबल डेकर नसलेल्या कोचसह एलएच बी गाडी एलटीटी मडगाव दरम्यान धावणार आहे.
रेल्वेकडून करण्यात आलेल्या या बदलामुळे गेली आठ वर्षे वातानुकूलित डबल डेकर एक्सप्रेस म्हणून धावणारी गाडी कोकण रेल्वेच्या रुळांवरून गायब होणार आहे. खरे तर रेल्वेतील कोकणद्वेष्ट्या बाबूंना डबल डेकर एक्सप्रेस काही वर्षापूर्वीच बंद करायची होती. मात्र जनरेटा आणि तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्तक्षेपामुळे रेल्वेतील अमराठी बाबूंचा प्रयत्न त्यावेळी हाणून पाडला गेला होता. मात्र आता एक गाडी दुसऱ्या गाडीत विलीन करण्याच्या नावाखाली कोकण रेल्वे मार्गावर मोठ्या दिमाखाने धावणारी डबल डेकर एक्सप्रेस अन्यत्र वळवली जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
कोकण रेल्वे मार्गावरून बंद केलेली डबल डेकर एक्सप्रेस आता नेमकी कोणत्या मार्गावर चालवली जाणार याचा शोध कोकण रेल्वे प्रेमी रेल्वे अभ्यासकांकडून घेण्याचे काम सुरू झाले आहे.