कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी आणखी विशेष गाड्या जाहीर
गणपतीसाठी गावी येणार्या चाकरमान्यांना दिलासा
रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी वाढीव फेर्या जाहीर करण्यात आल्या आहेत. लो. टिळक टर्मिनस ते कुडाळ, कुडाळ ते पनवेल तसेच सावंतवाडी ते पनवेल दरम्यान गणपती विशेष गाड्यांच्या अतिरिक्त फेर्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर लो. टिळक टर्मिनस ते कुडाळ (01167/01168), कुडाळ ते पनवेल (01170/01169) तसेच सावंतवाडी ते पनवेल (01171/01172) या गणपती स्पेशल गाड्यांची घोषणा कोकण रेल्वेकडून करण्यात आली आहे. याबाबत रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार लो. टिळन टर्मिन ते कुडाळ विशेष गाडी दि. 24 ऑगस्ट 2022 रोजी मध्यरात्री 12.45 सुटेल आणि त्याच दिवशी ती कुडाळला सकाळी 11 वा. पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी (01168) कुडाळ येथून दि. 25 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ती मुंबईत लो. टिळक टर्मिनसला 11 वा. 55 मिनिटांनी पोहचेल.
दुसरी अतिरिक्त गणपती विशेष गाडी कुडाळ ते पनवेल मार्गावर धावणार आहे. ही गाडी कुडाळहून दि. 24 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 10.55 वाजता पनवेलला पोहचेल. पनवेल ते कुडाळ मार्गावर धावताना ही गाडी पनवेल येथून दि.25 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12 वा. 10 मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी कुडाळला ती सकाळी 9 वाजता पोहचेल.
तिसरी विशेष गाडी लो. टिळक टर्मिनस ते सावंतवाडी मार्गावर धावणार आहे. ही गाडी दि. 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4.55 वाजता सुटून दुसर्या दिवशी पहाटे 4 वाजता ते सिंधुदुर्गात सावंतवाडी स्थानकावर पोहचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी सावंतवाडी येथून दि.26 ऑगस्ट रोजी पहाटे 4 वा. 40 मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मुंबईत लो. टिळक टर्मिनसला पोहचेल.