जासई हायस्कूलमध्ये वृक्षदिंडीसह गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
उरण दि 13(विठ्ठल ममताबादे ) : रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा. पाटील जुनियर कॉलेज जासई या विद्यालयात वृक्षदिंडी व गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. वृक्षदिंडी चे पूजन विद्यालयाचे चेअरमन अरुण शेठ जगे तसेच रघुनाथ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थित वृक्षदिंडीची भक्ती भावाने मिरवणूक काढण्यात आली या वृक्षदिंडीमध्ये विद्यार्थी व सेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .तसेच विद्यालयात व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे चेअरमन अरुण शेठ जगे व विद्यालयाचे प्राचार्य रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर अरुण घाग यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गुरुजनां विषयी कृतज्ञता व्यक्त केली. गुरुपौर्णिमा व गुरुजनांविषयी महिती विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून सांगितली. तसेच विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक शेख सर व मयुरा ठाकूर यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व आपल्या मनोगता मधून व्यक्त केले.विद्यालयाचे प्राचार्य अरुण घाग सर यांनी भारतीय गुरुपरंपरेची महती सांगून विद्यालयातील सर्व गुरुजनांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.तसेच विद्यालयाचे चेअरमन अरुण शेठ जगे यांनीही विद्यालयातील सर्वांना या प्रसंगी शुभेच्छा दिल्या .शेवटी घरत पी.जे मॅडम यांनी मान्यवरांचे आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली.