दुसऱ्या दिवशीही नगर पंचायत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरूच
राज्यात सर्वत्र नगर परिषद, नगर पंचायत कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन
कर्मचाऱ्यांना अजूनही न्याय नाही
उरण (विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी /संवर्ग कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी सदस्य आता आपल्या मागण्यासाठी आक्रमक झाले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील नगर परिषद, नगर पंचायत कर्मचाऱ्यांचा 1 मे 2022 पासून कामबंद आंदोलन सुरु असून आंदोलनाचा आज दिनांक 2/5/2022 रोजी दुसरा दिवस आहे.संपूर्ण महाराष्ट्रातील नगर परिषदेचे तसेच नगर पंचायतचे अधिकारी कर्मचारी वर्ग या बेमुदत काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत.जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हा लढा असाच सुरु राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी/संवर्ग कर्मचारी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरेश पोसतांडेल यांनी दिली आहे.उरण नगर परिषदेच्या गेट समोर हे बेमुदत आंदोलन सुरु आहे.या आंदोलनात महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी / संवर्ग कर्मचारी संघटनेचे सर्व पदाधिकारी सदस्य सहभागी झाले आहेत.मागण्या पूर्ण होत नसल्याने हा लढा आता अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
कामगारांच्या मागण्या
राज्यातील नगरपालिका व नगरपंचायत कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला शंभर टक्के वेतन कोषागार मार्फत मिळावे, राज्य सरकारने सहाय्यक वेतन अनुदान ऐवजी वेतन अनुदान मंजूर करावे ,दहा- वीस -तीस वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ द्यावा, सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची तीन हप्ते मिळावेत, नव्याने झालेल्या नगरपंचायत येथील सफाई कामगारांसह सर्व कर्मचाऱ्यांना विनाशर्त विनाअट समावेशन करावे, सर्व नवीन नगरपंचायत मधील सफाई कर्मचाऱ्यांची आकृतिबंध यामध्ये पद निर्मिती करावी ,सेवेत असताना मयत झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसाहक्काने किंवा अनुकंपा योजनेअंतर्गत नियुक्ती द्यावी, नगर परिषदेचे थकित सहाय्यक अनुदानाची रक्कम त्वरित मिळावी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांची कायदेशीर देणी एकरकमी द्यावीत तसेच दरमहा निवृत्ती वेतन एक तारखेला द्यावे, हंगामी व ठेकेदार कर्मचाऱ्यांना समान कामाला समान वेतन या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णया प्रमाणे वेतन मिळावे तसेच सर्व कायदेशीर लाभ मिळावेत.