धीरज वाटेकर यांचे पर्यटन-पर्यावरण विषयक जन-जागृतीचे काम स्तुत्य
चिपळूणचे आ. शेखर निकम यांच्या हस्ते सत्कार
चिपळूण : समाजात चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्याची संधी ‘लोटिस्मा’ वाचनालयामुळे मिळते. धीरज वाटेकर यांचा सत्कार हा आगळावेगळा आहे. त्यांचे पर्यटन-पर्यावरण विषयातील जन-जागृतीचे काम चांगले आहे. ते एकमेकांशी पूरक आहे. आपल्या आजूबाजूला असलेल्या कोकणातील पर्यावरण चांगलं असेल तर पर्यटक वाढणार आहेत. त्यामुळे सर्वांनी पर्यावरणाकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पर्यटन-पर्यावरण विषयाकडे वळवण्याचे सुरु असलेले हे काम अधिक गतीने पुढे न्यावे अशा शब्दात यासाठी आ. निकम यांनी वाटेकर यांना शुभेच्छा दिल्या.
राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालेलं असतानाही स्वत: वेळ दिलेली असल्याने या आणि अन्य एक अशा दोन कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिल्याचे आ. निकम यांनी सांगितले.
येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वतीने, गेली पंचवीस वर्षे कोकणातील पर्यटन आणि पर्यावरण विषयात काम करणारे कार्यकर्ते आणि लेखक धीरज वाटेकर यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन राज्यभरातील संस्थांनी केलेल्या सत्कारांच्या पार्श्वभूमीवर आ. शेखर निकम यांच्या हस्ते चिपळूणकरांतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी चिपळूण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक प्रसाद शिंगटे, ज्येष्ठ कवी आणि समीक्षक अरुण इंगवले, वाचनालयाचे कार्याध्यक्ष धनंजय चितळे, कार्यवाह विनायक ओक आदी उपस्थित होते. धीरज वाटेकर यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना स्वतःला, निसर्गशक्तीने ठरवून दिलेल्या कर्तव्याची पूजा बांधलेला मनुष्य म्हटले. सतत कुठल्या ना कुठल्या कामाच्या नशेत वावरणाऱ्या माणसाच्या नशीबात अचानक आलेला हा सत्कार योग असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात २५ वर्षांपूर्वी रत्नागिरी अ.भा. वि. प. आयोजित दुसरे युवा साहित्य संमेलन ‘प्रतिभा संगम’ निमित्ताने त्यांच्या सामाजिक जाणीवा जीवंत झाल्या होत्या. आपलं शिक्षण, करिअर आणि नोकरी हे तीन भिन्न प्रांत नसावेत तर ते एकमेकांना पूरक, आपल्या आंतरिक इच्छेला सामाजिक प्रेरणेला, संवेदनेला सतत जागृत ठेवणारे असावेत या भावनेतून कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘अभाविप’ विद्यार्थी संघटनेनंतर ‘लोटिस्मा’ वाचनालय ही आपल्या जीवनातील दुसरी प्रयोगशाळा असल्याचे वाटेकर यांनी नमूद केले. ज्या कारणासाठी सत्कार झाला ते काम कोकणात असंख्य कार्यकर्ते-बंधू-भगिनी करत असल्याने अशा सर्वाना वाटेकर यांनी आपला सत्कार समर्पित केला. उपस्थित जनसमुदायाप्रति मनापासून कृतज्ञता व्यक्त करताना ‘विकसित व्हावे, अर्पित होऊनि जावे’ या विचाराने आपण कार्यरत होऊ या अशी विनंती त्यांनी केली.
‘अपरिचित कोकणची सफर’
धीरज वाटेकर यांनी यावेळी उपस्थितांना दृकश्राव्य माध्यमातून ‘अपरिचित कोकणची सफर’ घडविली. कोकणातील अप्रतिम शिल्प, गडकोट, मंदिरे हा सारा ठेवा गतकाळातील पूर्वजांच्या कर्तृत्वाने मन मोहरून यावे असा असल्याने आपण कोकणच्या गतवैभवाचा, इतिहासाचा अभिमान बाळगू या आणि काम करू या असे ते म्हणाले. ८२ पॉवरपॉईंट स्लाईड्सद्वारे त्यांनी श्रावण कृष्ण त्रयोदशी या कोकण क्षेत्र निर्मिती दिनापासून कोकणातील निसर्गस्थाने’, ‘वशिष्ठी उगम ते संगम’ उपक्रम, तिलारी-दोडामार्ग-खडपडे-कुंभवडे-चौकुळ-आंबोलीचे जैवविविधतेने परिपूर्ण निसर्ग वैभव, ३६५ दिवस आंबोली संकल्पना, रौद्रभीषण निसर्गनवल ८०० फुट उंचीचा भीमाची काठी सुळका, तिवरे ते मालदेव व्हाया बैलमारव घाट, कुंभे निजामपूर बोगदा परिसर निसर्ग, कोकणातील ठाणे-पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील सागरकिनारे, हेदवीची समुद्रघळ, मालवण आणि रत्नागिरी येथील स्कुबा डायव्हिंग, त्सुनामी आयलंड (मालवण), कोकणातील खाडी किनाऱ्यावर असलेले वैशिष्ट्यपूर्ण किनारी आणि सागरी दुर्ग, १६६१ ला छत्रपती शिवाजी महाराजांनी घनदाट अरण्यात गनिमी कावा तंत्राचा अवलंब करून कारतलबखानाच्या नेतृत्वाखालील मुघल सैन्याचा पराभव केलेली या उंबरखिंड, कोकणातील कोकणात ६४ नद्यांच्या खोऱ्यात असलेल्या ४२ रमणीय खाड्या, कोकण आणि देश याना जोडणारे घाट रस्ते, धबधबे, पाऊस, सडा : कोकणातील एक वैशिष्ट्यपूर्ण परिसंस्था, कमळतळी, तळ कोकणातील धरणे, कोकणातील संग्रहालये, प्राचीन विहिरी, मानवी संस्कृतीचं मूळ शोधण्याचा प्रयत्न करणारी कातळशिल्पे, कोकणातील जलमंदिरे, गुहा मंदिरे, देवराया, दगडी पार, पोर्तुगीज घंटा, वारूळ देवता, किमान हजार वर्षेपूर्व मूर्तीकला, लाकडावरील कोरीव काम, जल संचयन पद्धती, कोकणी श्रद्धा, कोकणातील अष्टविनायक, बारव, दर्गे-मशीद, पारंपरिक मासेमारी, सागरी महामार्गाचे सौंदर्य, अश्मयुगकालीन गुहा, जंगलातील दुभंगलेल्या मूर्ती, मिठागरे, हेरीटेज होम, कोकणातील उत्सव, कोकणातील माणसे, इथली वाचनालये आणि माध्यमांची परंपरा आदी कोकणातील अपरिचित मुद्यांचा उहापोह वाटेकर यांनी आपल्या सादरीकरणात केला.
यावेळी प्रकाश देशपांडे यांना अमृतमहोत्सवी कारकीर्दीनिमित्त ‘लोटिस्मा’ कार्यकारिणीकडून आ. शेखर निकम यांच्या हस्ते टॅब मोबाईल भेट देण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक धनंजय चितळे यांनी केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने वाचनालयाच्या कार्यकारिणीतील सदस्याचा जाहीर सत्कार करण्याचा योग आल्याचे चितळे यांनी नमूद केले.धीरज वाटेकर लेखन, संपादन, पत्रकारिता, वैशिष्ट्यपूर्ण निवेदनशैली आदी ‘अष्टपैलू’ कामाचे त्यांनी कौतुक केले. पक्षी आणि पर्यावरणाप्रति असलेली संवेदनशीलता, हळुवारपणा लेखनातून सोशल मिडीयावरील पोस्टमधून डोकावत असल्याचे चितळे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसाद शिंगटे यांनी बोलताना, ही ‘अपरिचित कोकणची सफर’ अधिकाधिक लोकांना घडवून आणण्याची गरज व्यक्त केली. कोकणातील वास्तू मागील इतिहास उलगडण्याची आवश्यकता आहे. आपल्या आजूबाजूला असलेल्या ‘बारव’ उजेडात येणे गरजचे आहे. पर्यटन-पर्यावरण क्षेत्रात धीरज वाटेकर हे काम करत असून ते कौतुकास्पद असल्याचे शिंगटे यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अंजली बर्वे यांनी केले. आभार कार्यवाह विनायक ओक यांनी मानले. यावेळी ग्लोबल चिपळूण पर्यटन संस्थेचे चेअरमन श्रीराम रेडीज, कृषीतज्ज्ञ संजीव अणेराव, ‘जलदूत’ शाहनवाज शाह, वसंतराव चौगुले पतसंस्थेचे मॅनेजर विश्वास पाटील, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्य कार्याध्यक्ष विलास महाडिक, वन्यजीव अभ्यासक मल्हार इंदुलकर, सर्पमित्र अनिकेत चोपडे, लेखक रवींद्र गुरव, कथाकार संतोष गोनबरे, लेखिका संध्या साठे-जोशी, सरोज नेने मॅडम, भाषाशास्त्राचे अभ्यासक मच्छिंद्रनाथ वाटेकर, अलोरे हायस्कूलचे मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध, माजी मुख्याध्यापक अरुण माने, शशिकांत वहाळकर, आरोग्यम लबोरेटरीचे डॉ. तेजानंद गणपत्ये, डॉ. शामकांत गजमल, महंमद झारे, न्यू कोकण दीप चे संपादक सज्जाद काद्री, सायकलदूत कैसर देसाई, हॉटेल व्यावसायिक प्रसाद काणे, संजय सुर्वे, सुधाकर घोटगे, शाहीर राष्ट्रपाल सावंत, साहित्यिक प्रकाश देशपांडे, डॉ. रेखा देशपांडे, सुनील टेरवकर, धीरज वाटेकर यांचे कुटुंबीय आणि वाचनालयाचे संचालक उपस्थित होते.