नवनिर्माणचा बाल चमू रमला रंगरेषांच्या दुनियेत !
संगमेश्वर : नवनिर्माण संस्थेतर्फे लोवले संगमेश्वर येथे चालविल्या जाणाऱ्या नवनिर्माण इंग्रजी माध्यमातील शाळेतील इयत्ता पहिली चे चौथीच्या ४० विद्यार्थी आणि शिक्षकांनी पैसा फंड कलादालनाला भेट दिली . एकाच ठिकाणी असंख्य चित्र आणि शिल्पे ठेवलेली पाहून हे सारे बालमित्र कलेच्या या अनोख्या दुनियेत हरवून गेले .
या बालमित्रांना पैसा फंडच्या कलाविभागातर्फे गेली २२ वर्षे चालविल्या जाणाऱ्या ‘ कलासाधना ‘ या उपक्रमातील विद्यार्थ्यांनी काढलेली चित्रे दाखविण्यात आली . प्रत्येक चित्र पाहून या बालमित्रांच्या तोंडून एकाच वेळी ‘ वा ‘ अशी आनंदभरित दाद मिळत होती . कलाविभागातर्फे या सर्व मुलांजवळ संवाद साधण्यात आला . चित्र कशी काढायची , रेखाटताना कोणती काळजी घ्यायची , रंगविण्यासाठी कोणते माध्यम वापरायचे , चित्रांचा संग्रह कसा करायचा याविषयी सहज सोप्या भाषेत माहिती सांगण्यात आली . पुढील शैक्षणिक वर्षापासून नवनिर्माण इंग्रजी माध्यम शाळेत चित्रसंग्रह तयार करण्याचा उपक्रम हाती घेण्यात येइल अशी ग्वाही नवनिर्माणच्या शिक्षकांनी यावेळी दिली .
कलादालनातील चित्र पहाताना या छोट्या बालमित्रांनी उत्सुकतेपोटी काही शंका उपस्थित केल्या . यावेळी सर्व बालकलारांना चित्रातील विषय आणि वैशिष्ट्ये यांची सोप्या शब्दात उकल करुन सांगण्यात आले . सर्व विद्यार्थी अत्यंत शिस्तीत एकापाठोपाठ एक या क्रमाने कलादालनातील कलाकृती पहात होते . चित्रांची ही न्यारी दुनिया प्रथमच पहायला मिळत असल्याने सर्व मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद अक्षरशः ओसंडून वहात होता . आज मुलांना घेऊन आम्ही कलादालन पाहिले आणि येथून जाताना कलाविषयाची एक नवी उर्जा घेऊन आम्ही जात आहोत . आमच्या विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या चित्रांचा संग्रह तयार करण्याचे आम्ही येथे आल्यानंतर नक्की केले हे पैसा फंड कलादालन भेटीचे फलित असल्याचे नवनिर्माणचे शिक्षक किरण गुरव , स्वरा शेट्ये , रिया चव्हाण आणि स्वरा प्रसादे यांनी सांगितले .
पैसा फंड कलाविभागाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना सेवक अनंत जाधव यांनी कॅडबरी चॉकलेट देवून त्यांचे तोंड गोड केले . व्यापारी पैसा फंड संस्थेचा उद्देश हे कलादालन सर्वांनी पहावे असा आहे . छोटे विद्यार्थी हे उद्याचे मोठे कलाकार आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी आमचे कलादालन नक्कीच मार्गदर्शक ठरेल असे संस्था सचिव धनंजय शेट्ये यांनी सांगितले आणि परिसरात शाळांनी देखील पैसा फंडचे कलादालन पहायला यावे असे आवाहन केले . नवनिर्माणच्या सर्व मुलांनी कलादालन पाहून झाल्यानंतर ९ फूट उंच उभारलेल्या पेंसिल जवळ उभे राहून सेल्फी घेतले आणि भविष्यात आम्ही या पेंसिलच्या टोकापर्यंत जावून यश मिळविणार असल्याचा संदेश दिला .