https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

नवरात्री विशेष…! हाकेला धावणारी नवसाला पावणारी केळवणेची गावदेवी भवानी माता

0 94

केळवणे  गावातील गावदेवी भवानी मातेचे  मंदिर प्रसिद्ध  असून ते अति प्राचीन व जागृत देवस्थान आहे. विशेष म्हणजे चैत्र पौर्णिमेचा उत्सव जो हनुमान जयंती व देवीचा विशाल वनभोजन एकाच दिवशी आणि  नवरात्र  मोठ्या श्रद्धा भक्तीने साजरी होते. आई भवानी म्हणजे मातेचे सौम्य रूप, हिंदूंची प्रमुख देवता. देवी म्हणजे शक्ती तिची तुलना साक्षात पर्-ब्रम्हाशी केली जाते. देवीला आदिशक्ति, प्रधान प्रकृति, गुणवंतीमाया, बुद्धीतत्वाची जननी तसेच विकार रहित समजतात. अहंकार व अज्ञानरूपी राक्षसांपासून रक्षण करणारी कल्याणकारी व शांती समृद्धी तसेच धर्मावर आघात करणाऱ्या राक्षसी शक्तीचा नाश करणारी देवी समजतात. 

 एका बाजूला डोंगराळ जंगली भाग तर एका बाजूस खाडी व समुद्र किनारा असलेलं सुख-समृद्धीने नटलेलं गाव म्हणजे केळवणे. आज १५००० च्या पार लोकवस्ती असलेले गाव  एके काळी काही मोजक्या घरांचे खेडेगाव (आताची जुनी आळी) होते . गावाच्या आग्नेय बाजूला पहिली टेकडी म्हणजे केळवणे पाडा, तर उत्तरेस उसरण भाग जेथे  देवीचे मंदिर आहे तेथे  काही तुरळक घरे होती . तेथूनच उत्तरेकडे सुरू होणारे दाट जंगल. आज जे देवीचे मंदिर आहे तेथे मंदिर किंवा देवी नव्हती. देवीचे मुळ स्थान वर डोंगरावर होते, जो घनदाट वृक्षानी आच्छादलेला पण आज झाडे नसल्यामुळे त्याला
जंगली हिंस श्वापदे यांच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून उसरण भागातील लोक हळूहळू जुनीआळी ,पाडा यांच्या अवती भोवती राहू लागली, जंगली प्राण्यांच्या भीतीने उत्तरेस कोणी जास्त फिरकतही नव्हते. देवीच्या डोंगरावर जाणे तर शक्यच नव्हते. भक्तांना खूप वाटायचे देवीचं दर्शन घ्यावं तिची पुजा करावी, खणा-नारळाने ओटी भरावी; पण हे शक्य नव्हते. भक्तांची तळमळ आई भवानीने ओळखली आणि चमत्कार झाला. उसरण भागात गेलेल्या गुराख्यांना तेथे देवीच्या मूर्ती दिसल्या. त्यांनी ही गोष्ट गावकऱ्यांना सांगितली. त्यावेळच्या पाटलांनी ह्या देव्या डोंगरावरच्या असल्याचे स्पष्ट केले व त्यानंतर तेथे गावकऱ्यांनी छोटेसे कौलारू मंदिर बांधले व देवीची नियमित पुजा-आरती होऊ लागली. देवीचं येथे येणे तिचेच नियोजन असावे कारण येणाऱ्या संकटांची तिला कल्पना होती. शेवटी ती जग्दजननी, आपल्या मुलांची चिंता तिला होती .
१९४० साली गावात कॉलरा रोगाच्या साथीने ५० ते ६० लोक मेले. रोज स्मशानभुमी पेटलेलीच असे. काही काही लोकांना तर मातीतच पुरले जाऊ लागले. प्रत्येक आळीतील लोक बाहेर अंगणात जागुन पहारा देत. कधी कोण मरेल सांगता येत नव्हते. हा प्रकोप दुर व्हावा म्हणून जुन्या आळीत अध्याय चालू केला, तर मधल्या आळीत अक्षय तृतीयेला पुजा व पाठोपाठ वरचीआळीला सुद्धा पुजा सुरू केली. सर्व ग्रामस्थांनी चर्चा करून गावदेवी भवानीला साकडे घातले. त्यावेळी गावचे प्रमुख पाटील होते, नामदेव नाना पाटील . त्यांच्या मार्गदर्शनात देवीचा मानपान करून पडी भरून गावाच्या दक्षिणेस कागणीचा कोठा ज्याला गर्गा बोलत तेथे   नारायण महादु पाटील यांनी नेली.  त्यांच्या बरोबर त्या वेळचे पाटील खंड्य कमळ्या व पूर्ण गाव होता. तो मान दिल्यानंतर आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकही माणूस दगावला नाही. दुसरी घटना होती १९४६ ला गावाच्या माळरान भागात वाघाने थैमान घातले होते ,भीतीने लोकांना बाहेर निघणे नकोसे झाले होते ,पण त्याचा प्रतिकार करायची कोणाची हिम्मत होत नव्हती , अश्यात पश्चिमेकडे टेपावर वाघ आल्याचे कळाले. काही तरूणांनी देवीचा आशीर्वादरुपी भंडारा घेऊन वाघाला मारायला गेले. जणू त्यांना आईभवानीची शक्तीच मिळाली. त्या वेळी गणपत उंदऱ्या कोळी यांनी पहिला भाला मारून वाघाला जेरबंद केले व नंतर सर्वांनी मिळून वाघाला मारले व गावाचे संकट भवानीमातेच्या कृपेने दूर झाले. तेव्हापासून गणपत कोळी व त्यांच्या कुटुंबाला वाघमारे संबोधु लागले.
देवीच्या चमत्कारिक चर्चे मुले गावाची कीर्ती पंचक्रोशीत पसरू लागली. ११ गावांतील न्याय निवडा मुख्य गाव म्हणून केळवणे येथे होऊ लागला व पुढे १९५२ ला गावात ग्रामपंचायतेची स्थापना झाली 
आणि ……..
सर्व सुरळीत असताना अचानक अकल्पित घडले….मंगळवार सन  १९५६ वेळ दुपार तीनची , बाब्या हिरु शेडगे व पत्नी रामीबाई उसरण भागात आपल्या शेतावर जात असताना एक आर्त किंकाळी कानावर आली. कुठून आवाज येतोय म्हणून बघताच चार-पाच मुले पळून जात होती. थोडे पुढे  देवळाच्या मागे
रांजणीच्या झाडाखाली येऊन बघताच दोघेही सुन्न झाली. रामीबाईने तर धावा-धावा म्हणून ओरडायला सुरूवात केली. रांजणीच्या झाडावरून एक सतरा -अठरा वर्षाचा तरुण खाली पडून , मान वाकडी झालेली ,डोके फुटून रक्त वाहत होते, कमरेला मार लागुन कणा वाकलेला आणि एक पाय दुमडुम तुटलेला ,सुन्न शरीर फक्त हाताची बोटे थरथरत होती. बाब्या शेडगेने परिस्थितीचे गांभीर्य पाहता गावात धुम ठोकली. काही वेळात ओळख पटताच गावातुन लाकडी खाट आणून त्यावर त्याच्या घरी नेले. हा तरूण म्हणजे तीन महिन्यापूर्वी ठकुबाई  या चौदा वर्षीय मुलीसोबत लग्न झालेला तरूण म्हणजे हिराजी शंकर शिवकर. त्यावेळी लग्न लहान वयात होत असत. ठकुबाईने त्यावेळी देवीला नवस केला,आई भवानीमाते माझ्या कुंकवाच रक्षण कर , जीव वाचवलास तर तुझ्या मंदिराच्या छायेत नऊ दिवस राहीन . ही परीक्षा होती सौभाग्यवतीच्या भक्तीची आणि देवीच्या शक्तीची,अखेर आईभवानीने चमत्कार केला. पिरकोनचे  मारुती परदेशी वैद्य  यांच्या औषधीला,चिरनेरच्या रघुनाथ कराडी यांच्या लाकडाच्या चिंबानी हाडे जोडण्याला व बेड्यावरील लक्षाबुवांच्या मालिशला देवी मुळे यश आले.नवऱ्याचे प्राण वाचले म्हणून ठकुबाईनं ठरल्याप्रमाणे नऊ दिवस देवीच्या देवळात जोडीनं खोड्या-बेऱ्या  (चाफ्याच्या लाकडाच्या रिंगणा) कैद्यांप्रणाणे घालुन नवस फेडला. आता सर्वत्र देवीची कीर्ती पसरू लागली. मुलबाळ होत नाही ,असाध्य रोग रोग बरा होत नाही, संकटसमयी कोणताही मार्ग सापडत नाही त्या वेळी फक्त  “आई गावदेवी भवानी माते वाचव” असे  मुखातून शब्द नक्कीच येतात. गावोगावचे लोक दर्शनासाठी येतात, आपले गाऱ्हाणे देवीला सांगून नवस बोलतात आणि आपल्या सवडीने देवळात बसून मानपान देऊन पूर्ण करतात. पंचक्रोषीतील हे एकमेव मंदिर असेल जेथे न‌ऊ दिवसांचा हा नवस फेडणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त असते. पूर्ण मंदिर,आवार व परिसरातील जागा भरलेलीच असते. केळवणे गावचे आधीचे ब्राम्हण शांताराम भटजी नंतर त्यांचा मुलगा नरसु व पुढे बाळकृष्ण नातू व त्यांचा मुलगा शशिकांत यांनीच मंदिरावर ट्रस्टची स्थापना केली. शशिकांत यांच्या निधनानंतरही केळवणे ग्रामस्तमंडळ व गावकरी अगदी यथाशक्ति व्यवस्थितपणे देवी व तिचे उत्सव कार्य करत आहेत. गेल्या काही वर्षापूर्वी  हे जागृत आणि पुरातन मंदिरात खूप बदल झाला आहे. नव्यानं  स्थापन झालेल्या मंदिर  कमेटीचे अध्यक्ष रा.जि.प.सदस्य श्री .ज्ञानेश्वर दशरथ घरत यांच्या अथक प्रयत्नाने छोट्याशा मंदिराचे आता सुशोभित, विस्तारीत आणि भव्यदिव्य स्वरूपात रूपांतर झाले आहे. आता मंदिरात नेहमीच होम-पुजन-हवन व इतर अध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम नेहमी मोठ्या भक्ती आणि उत्साहाने होतात

अजय शिवकरकेळवणे, पनवेल ७९७७९५०४६४

Leave A Reply

Your email address will not be published.