नाणीज ग्रामपंचायतीचा विधवा प्रथा बंदचा निर्णय कौतुकास्पद
ना. उदय सामंत यांच्याकडून ग्रामस्थांचा गौरव
नाणीज, दि. १९: येथील विधवा प्रथा बंद करण्याच्या निर्णयाचे मी कौतुक करतो. रत्नागिरी जिल्ह्यातील ही पहिलीच ग्रामपंचायत आहे जिने हा धाडसी आणि पुरोगामी आधुनिक विचारसरणीचा निर्णय घेतला आहे,असे गौरवोद्गार उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी येथे काढले.
ग्रामपंचायतीच्या ठरवानंतर ग्रामस्थांचे कौतुक करताना ते बोलत होते. मंत्री पुढे म्हणाले,”
माझ्या मतदारसंघात ही खूप चांगली गोष्ट होत आहे, याचा मला खूप अभिमान आहे. मला मुंबईला असताना ही बातमी समजली. त्यामुळे सर्वांचे कौतुक करण्यासाठी इथे आलो आहे. हा धाडसी आणि अतिशय आधुनिक विचार करण्याचा निर्णय घेतल्यामुळे मी ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे अभिनंदन करतो.”
ते म्हणाले, “आता हा निर्णय फक्त कागदावर न राहता या निर्णयाची अंमलबजावणी घरोघरी व्हायला हवी. प्रत्येक महिलेने दुसऱ्या महिलेचे आयुष्य कसे सुधारेल, यासाठी पाऊल उचलायला हवे. घरोघरी ही प्रथा मनापासून बंद व्हायला हवी तरच आपण पुढे चांगल्या प्रकारे एकजुटीने कार्य करू.”
” जिल्ह्यातील ही पहिली ग्रामपंचायत आहे, जिने विधवा प्रथा बंद केली आहे. याचे सर्वांनी स्वागत करून आपण सर्वांनी ही प्रथा आता फक्त कायदा करूनच नव्हे तर मनापासून नष्ट करायला हवी. घरोघरी प्रत्येकाने निर्णय घ्यायला हवा. या ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार मला होता आले याचा मला खूप अभिमान आहे. असेच उत्तरोत्तर चांगले कार्य सर्वांकडून घडत राहो.”
मंत्री उदय सामंत यांचे स्वागत आणि औक्षण विधवा भगिनींनी केले. याप्रसंगी मा. सामंत यांनी विधवा भगिनींचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. त्याचबरोबर त्यांना वटवृक्षाचे रोपही भेट दिले. याप्रसंगी नाणीज येथील रहिवाशांचे प्रश्न आणि गावातील काही समस्यांबाबत सुद्धा ग्रामस्थांनी चर्चा केली. त्यावर मी लवकरच या सर्व प्रश्नांची पूर्तता करतो, असे आश्वासनही दिले.
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक ,उपजिल्हाप्रमुख महेश माप, विभाग प्रमुख सचिन सावंत, महिला संघटक विद्या भोंगले, संस्थानाचे सी ई.ओ. विनोद भागवत
त्याचबरोबर नाणीजचे सरपंच गौरव संसारे, उपसरपंच राधिका शिंदे, गावचे पोलीस पाटील नितीन कांबळे, ,ग्रामपंचायत सदस्य विनायक शिवगण, दत्ताराम शिवगण, राजन बोडेकर , संध्या गुरव ,अनुजा सरफरे, पूजा पंडित, संजना रेवाळे, माजी सरपंच सुरेंद्र सावंत, दत्ताराम खावडकर,
नाणीज येथील आशा वर्कर मालती गावडे, आर्या गुरव, भूमी सावंत, प्रतिभा रेवाळे, मेघा गुरव,आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रा. प. सदस्य विनायक शिवगण यांनी केले तर आभार संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद भागवत यांनी मानले.
फोटो ओळी–
नाणीज ग्रामस्थांपुढे बोलताना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत. शेजारी विधवा भगिनींचा सत्कार करताना मंत्री सामंत.