पुनर्वसनासाठी हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ उद्या अलिबागला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार!
हनुमान कोळीवाडा गावातील ग्रामस्थ महिला मुलांसह धडकणार
उरण दि ७ (विठ्ठल ममताबादे ) दि.०६ ऑगस्ट २०२२ रोजी ग्रामसुधारण मंडळ हनुमान कोळीवाडा यांची गावातील सर्व ग्रामस्थ, महिला यांच्या उपस्थितीत संध्याकाळी ०५.३० वाजता हनुमान मंदिरात शेवा कोळीवाडा ( हनुमान कोळीवाडा ) गावाचे गव्हर्मेंट नॉर्मनुसार ८६ शेतकरी व १७० बिगर शेतकरी अशा एकूण २५६ कुटुंबांचे पुनर्वसन आढावा बैठक पार पडली.
दिनांक १७ नोव्हेंबर २०२१ रोजी मा. जिल्हाधिकारी, रायगड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गव्हर्मेंट नॉर्मनुसार पुनर्वसनासाठी लागणारी जमीन, नागरी सुविधा, २५६ भूखंड, व राहत्या घरांचे चालू बाजार भावाप्रमाणे मूल्यांकन देण्याचा निर्णय झालेला होता. त्यासाठी हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांची कमिटी स्थापन करून पुनर्वसनाचा दर आठ दिवसांनी आढावा बैठक घेण्याचा निर्णय घेतलेला होता.
दि. २४/११/२०२१ रोजी शासनाचे अधिकारी, JNPT अधिकारी,पोलीस अधिकारी, शेवा कोळीवाडा विस्थापित, यांनी संयुक्तपणे पहाणी करून कस्टम वसाहत जवळील गाव नकाशा जसखार व फुंडे येथील JNPT ची विकसित जमिन देण्याचे JNPT ने मान्य व कबुल केलेलें आहे. . मा.मुख्य प्रबंधक व सचिव JNPT यांनी दि.१२/०५/२०२२ रोजी मा.उप अधीक्षक भूमी अभिलेख,उरण याना JNPT च्या विकसित (जसखार -फुंडे ) येथील शेवा कोळीवाडा गावाच्या पुनर्वसनासाठी लागणाऱ्या जमिनीची मोजणी कऱण्यास अर्ज दिला होता.
उप अधीक्षक भूमी अभिलेख,उरण यांनी दि. १७/०६/२०२२ रोजी JNPT च्या विकसित जसखार व फुंडे च्या जमीन मोजणी करून नकाशा तयार करून JNPT ला दिलेला आहे.
JNPT ने तयार केलेल्या नकाशात सुधारणा करण्यासाठीं मा. नगर रचनाकार यांनी दि.१७/०१/२०२२ रोजी मा.जिल्हाधिकारी यांच्या कडे शासनाचे मापदंडाचे नकाशासाठी १ ते १० मुद्यांचे दस्तावेज मागितले होते. व सिडको ने दि.२८/०३/२०२२ रोजी नकाशात पुनर्वसन कायदा नुसार सन १९८५ साली मंजूर असलेले २५६ भूखंड व शासनाचे माप दंडा नुसार नागरी सुविधा MRTP Act,1966 & UDCPR प्रमाणे देऊन आराखडा तयार करण्यास JNPT ला सांगितलेला आहे. त्या नुसार JNPT नी आजतागायत नकाशा तयार केलेला नाही. ग्रामस्थांनी व पोलीस प्रशासनानी वारंवार पाठपुरावा करून गेली आठ महिने उलटून हि पुनर्वसनाचा आराखडा तयार होत नाही. आणि मा. जिल्हाधिकारी रायगड हनुमान कोळीवाडा पुनर्वसन कमिटीला भेटण्यासाठी वेळ देत नाहीत. पण मा. जिल्हाधिकारी रायगड यांनी शासनाने विस्थापित हनुमान कोळीवाडा गावात नवीन ग्रामपंचायत स्थापना करून दिली होती.त्या वेळी हनुमान कोळीवाडा गावातील भूखंड धारक शेतकरी ८६ व बिगर शेतकरी १७०मिळून २५६ कुटूबे यांची यादी सह १७ हेक्टर जमिनीचा मौजे हनुमान कोळीवाडा गाव वहिवाट नकाशा व आकारबंध आणि गाव नमुना नंबर ७/१२ वगैरे वगैरे दस्तावेज देऊन आजतागायत ताबा दिलेला नाही. असे असताना दि.०८/०८/२०२२ रोजी दुपारी ३ वाजता अतिक्रमण विषयी सरपंचांचे विरोधात मा.जिल्हाधिकारी साहेबानी सुनावणी ठेवली आहे.
जिल्हाधिकारी यांनी पुनर्वसन बाबत वेळ देत नाही म्हणून तसेच ३५ वर्षाचा मानवी हक्कांचा छळ व सहनशीलतेचा अंत झाल्याने शासनाने ज्या कारणासाठी मूळ शेवा कोळीवाडा गावठाण संपादन केलेले आहे त्या कारणासाठी त्याचा अद्याप वापर झाला नसल्याने गावाचा ताबा घेण्याचा ग्रामस्थांनी एकमुखी निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय कळविण्यासाठी हनुमान कोळीवाडा गावातील सर्व ग्रामस्थ दिनांक ०८ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी ०३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार असल्याची माहिती सरपंच परमानंद कोळी, ग्रामसूधारणा मंडळाचे अध्यक्ष सुरेश दामोदर कोळी, उपाध्यक्ष मंगेश अनंत कोळी यांनी दिली.