https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

पुनर्वसन न झाल्याने हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ कायमस्वरूपी मूळ गावी शेवा कोळीवाडा गावात रहायला जाणार

0 94

पुनर्वसन न झाल्याने शासनाच्या निषेधार्थ पवित्रा

उरण दि १३ (विठ्ठल ममताबादे ) : शेवा कोळीवाडा गावातील ग्रामस्थांचे पुनर्वसन न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण पसरले आहे. वर्षानुवर्षे शासनाने ही महत्वाची समस्या तशीच प्रलंबित ठेवल्याने या ग्रामस्थांचा जीवन मरणाचा प्रश्न उभा राहिला आहे.पुनर्वसन न झाल्याने शासनाचा निषेध करत हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ कायम स्वरूपी आपल्या मूळ गावी शेवा कोळीवाडा गावात राहायला जाणार आहेत तसा ग्रामसभेत ठराव सुद्धा पारीत करण्यात आला आहे.

जेएनपीटि च्या प्रकल्पसाठी शेवा कोळीवाडा गावातील जमीन संपादन करण्यात आली होती. त्याबद्दल्यात ग्रामस्थांचे पुनर्वसन करण्याचे व इतर सेवा सुविधा पुरविण्याचे जेएनपीटि प्रशासनाने ग्रामस्थांना आश्वासन दिले होते. त्या आश्वासानांची वर्षानुवर्षे पूर्तता होत नसल्याने हा विषय आता आणखीनच गंभीर झाला आहे.हा विषय आणखीनच चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.त्यामुळे प्रशासनाने हा विषय त्वरित सोडवावा अशी मागणी हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांसह उरण मधील विविध सामाजिक संघटनानी प्रशासनाकडे केली आहे.

उरण तालुक्यात JNPT प्रकल्प जेथे उभा रहाणार होता तेथे शेवा कोळीवाडा, उरण, रायगड हे गाव होते.त्या गावाची शेवा कोळीवाडा ग्रामपंचायत होती.ती JNPT ला नको होती.म्हणून JNPT ने दुसऱ्या टप्प्यासाठी शेवा कोळीवाडा गावठाण लागणार आहे हे खोटे कारण सांगून सरकारकडे शेवा कोळीवाडा गावठाण मागितले होते.गेल्या ३७ वर्षात शेवा कोळीवाडा गावठाण JNPT ला लागले नाही,आणि भविष्यात लागणार नाही. असे असताना सरकारने JNPT वर विश्वास ठेवला होता. सरकारला JNPT ने शेवा कोळीवाडा गावाचे पुनर्वसनाची खर्चाची हमीची लेखी जबाबदारी सरकारला १२ नोव्हेंबर १९८२ रोजी दिली होती. ती गेल्या 37 वर्षात कागदावरच आहे. सरकारच्या सन १९८४ च्या जनगणने नुसार शेवा कोळीवाडा गावातील ८६ शेतकरी व १७० बिगर शेतकरी अशा एकूण २५६ कुटुंबांचे पुनर्वसन करण्याचे जाहीर केले होते. त्यांचे बोरीपाखाडी उरण येथे १७ हेक्टर जमिनीत शासनाचे माप दंडानंदाने पुनर्वसन करण्याचे ०८/०८/१९८५ ला मंजूर होते. पण JNPT ने फंड न दिल्याने आजतागायत ३७ वर्षे झाले तरी पुनर्वसन झालेले नाही. सरकारने शेवा कोळीवाडा गावातील ८६ शेतकरी व १७० बिगर शेतकरी अशा एकूण २५६ कुटुंबांना बोरीपाखाडी उरण येथील १७ हेक्टर जमिनी पैकी फक्त ९१ गुंठे जमिनीत संक्रमण शिबिरात ठेवलेले आहे. रोजीरोटीसाठी पर्यायी संपदा (नोकरी) दिलेली नाही. JNPT ने शेवा कोळीवाडा गावातील लोकांच्या जमिनी, साधन संपदा व घरे दारे सर्व हिरावून घेऊन ही शासनाच्या मापदंडानुसार पुनर्वसन करत नसल्याने आणि JNPT कडुन होत असलेला मानवी हक्कांचा छळ असह्य झाल्याने हनुमान कोळीवाडा (शेवा कोळीवाडा) गावातील ग्रामस्थांनी माननीय लोकायुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या दिनांक ११ जुलै २०१७ रोजीच्या आदेशानुसार ग्रामसभेत मूळ शेवा कोळीवाडा गावात कायमस्वरूपी रहायला जाण्याचा निर्णय घेऊन ठराव मंजूर केलेला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.