प्रवाशांची आरक्षित डब्यांमध्ये घुसखोरी
कोकण रेल्वे मार्गावरील गाडयांना मोठी गर्दी
रेल्वेच्या चुकीच्या धोरणामुळे प्रवाशांचा नाईलाज
रितसर आरक्षण करून प्रवास करणाऱ्याना नाहक त्रास
रत्नागिरी : ऊन्हाळी हंगामासाठी कोकण रेल्वेने विशेष गाड्या सोडल्या असल्या तरी या मार्गावरून नियमितपणे धावणाऱ्या गाड्यांना डबे न वाढवल्यामुळे सध्या कोकण रेल्वे मार्गावरील जवळपास सर्वच गाड्यांना तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. केवळ दोनच गाड्यांना अनारक्षित तिकिटे मिळत असल्यामुळे प्रवासी नाईलाजाने रिझर्व कोचमध्ये चढून प्रवास करत आहेत. यामुळे नियमित गाड्यांना डबे वाढवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
उन्हाळी हंगामामध्ये सध्या कोकण रेल्वेच्या गाड्यांना मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. त्यातच केवळ दिवा-सावंतवाडी आणि दिवा -रत्नागिरी या दोनच गाड्यांची अनारक्षित तिकिटे मिळत असल्यामुळे लोक नाईलाजाने आरक्षित गाड्यांमध्ये चढून प्रवास करत आहेत. याचा नाहक त्रास चार महिने आधीच बुकिंग करून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सहन करावा लागत आहे. याला रेल्वेचे चुकीचे धोरण कारणीभूत असल्याचा आरोप केला जात आहे.
हे प्रकार थांबवण्यासाठी कोकण रेल्वेने करंट बुकिंग पूर्वीप्रमाणेच देण्याची मागणी होत आहे. याचबरोबर कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या तुतारी, मत्स्यगंधा, जनशताब्दी तसेच मुंबई सीएसएमटी- मंगळुरू या चार गाड्याना 22 एचएचबी कोचसह चालवण्याची मागणी जोर धरत आहे.
या संदर्भात कोकण रेल्वेकडे रितसर पत्रव्यवहार देखील करण्यात आला आहे.