बेल डोंगरीवर जागतिक पर्यावरण दिन साजरा
उरण (विठ्ठल ममताबादे ): 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन हा जगभर साजरा करण्यात येतो. यंदाच्या पर्यावरण दिनाची थीम केवळ एक पृथ्वी आहे आणि स्वीडन हा देश यजमान आहे.
पर्यावरणाच्या संरक्षणासाठी जागरुकता आणि कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने अनेक स्तरांवर विविध कार्यक्रम राबविले जातात. त्याच उद्देशाने उरण विधानसभा मतदार संघातील तीन सामाजिक संस्था एकत्रीत येवुन चिरनेर परिसरातील चांदायली वाडीजवळील बेलडोंगरीवर दोन वटवृक्षांचे रोपन करण्यात आले. शिवाय गेल्या वर्षी लागवड केलेल्या झाडांना पाणी व तेथील परिसराची स्वच्छता करण्यात आली.
यंदाच्या पावसाळ्यात बेलडोंगरीवर स्वर्गीय आंनद मढवी यांची स्मृती जागवण्याच्या दृष्टीने शेकडो देशी वृक्षारोपन कार्यक्रम हाती घेतला असुन त्या परिसरात आत्तापर्यंत रोपलागवडीसाठी 90 खड्डे मारण्याचे काम पुर्णात्वास आले.आज वाढत्या तापमानवाढीचा आणि वायु प्रदुषणाचा विचार करता सर्वांनी या पावसाळ्यात एक तरी देशी झाड लावून वसुंधरेच्या संरक्षणासाठी कटीबध्द राहु या असा संदेश देत पर्यावरण दिन वृक्षारोपण करून उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी वनविभाग परिमंडळ -1 चे अधिकारी संजय पाटील, जासई विभागाचे वनपाल विश्वनाथ म्हात्रे, वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेचे अध्यक्ष विवेक केणी, महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रायगड भूषण मनोज पाटील, वटवृक्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण मढवी, धनंजय तांबे, वसंत वळकुंडे, दिलीप मढवी, काशिनाथ खारपाटील, समिर म्हात्रे, दिनेश जगताप, मनोहर फुंडेकर, केशव ठाकूर, विनीत मढवी आदी पर्यावरण प्रेमी उपस्थित होते.