मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात कंटेनर अचानक पेटला
गेल्या काही दिवसातील चौथी दुर्घटना
खेड : मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात दि. 20 रोजी दुपारी भोगाव येथे मालवाहून टेम्पोला आग लागली. या आगीत जीवित हानी झाली नसली तरी कंटेनरचे मोठे नुकसान झाले आहे. महामार्गावर गेल्या काही दिवसात चिपळूण खेड दरम्यान वाहने अचानक पेटल्याची ही चौथी घटना आहे.
कशेडी घाटात सोमवारी दि. 20 रोजी वापी येथून परचुटन माल घेऊन गोव्याच्या दिशेने आयशर टेम्पो (एम.एच.05/टी/3905) घेऊन चालक कामरान मुखत्यार खान (27 रा. जिरारीगाव, उत्तर प्रदेश) हा जात असताना कंटेनरच्या इंजिनमधून अचानक धूर येवू लागल्याने चालकाने तो रस्त्याच्या बाजूला उभा केला. टेम्पोतून उतरून तो रस्त्याच्या बाजूला दुरवर जाऊन थांबला. त्याच वेळी कशेडी घाटात गस्त घालणारे कशेडी टॅप पोलीस मदत केंद्रातील कर्मचारी समिल सुर्वे यांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ महाड एमआयडीसी व खेड नगर परिषद अग्निशमन दलाला कळवले. त्या नंतर घटनास्थळी पोहोचलेल्या अग्नीशमन दलाने कंटेनर ला लागलेली आग विझवली. कशेडी वाहतूक पोलिसांनी स्थानिक पोलादपुर पोलिस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार घटनास्थळी पोहोचेपर्यंत महामार्गावरील वाहतूक सुरक्षित सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न केले. या घटने दरम्यान दुपारी 1 वाजता कंटेनरला लागलेली आग नियंत्रणात आली.