उरण तालुक्यात लहान मुलांना पळविणारी टोळी सक्रीय?
उरण (विठ्ठल ममताबादे ) : सध्या शाळा सुरु झाल्याने सर्व शाळा तसेच शिकवणी (क्लासेस)समोर व शाळा, क्लासेसच्या आजू बाजूच्या परिसरात लहान मुले, बालके यांची खूप मोठी गर्दी दिसत असते. पालकांचीही गर्दी यावेळी दिसून येते.शाळेत किंवा शिकवणी (क्लासेस ) मध्ये कोण येतात,कोण जातात याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात.प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त आहेत. याचा फायदा मुलांना पळविणारी टोळीने घेतला आहे. आई वडील व्यस्त असल्याने त्याचा फायदा घेत काही अनोळखी व्यक्ती शाळेत किंवा शिकवणी (क्लासेस )मध्ये जाऊन मी मुलाला न्यायला आलो आहे असे सांगून त्यानंतर मुलाला जवळ घेऊन चॉकलेट, खाद्य पदार्थ देऊन, वेगवेगळे आमिष दाखवून पळवून नेतात. तुझ्या आई वडिलांनी मला तुला न्यायला पाठविले आहे, असे सांगून सुद्धा मुलांना पळविण्याचे प्रकार उरण मध्ये सुरु आहेत. त्यामुळे पालकांना आता सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.लहान मुलांना चोरणारी टोळी नजर चुकवून किंवा आमिष दाखवून लहान मुलांना पळवत असल्याने उरण मध्ये लहान मुलांना पळविणारी टोळी पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसते.
उरण तालुक्यात सध्या दोन घटना समोर आल्या आहेत.पहिली घटना अशी आहे. नवघर गावातील बस स्टॉप जवळ एक मुलगा शाळेत जाण्यासाठी गाडीची वाट पाहत उभा होता. अचानक एक महिला त्याच्यासमोर आली आणि त्याला चाकूचा धाक दाखवून घाबरविण्याचा प्रयत्न केला असता त्या मुलाने तेथून धाव ठोकून सरळ घर गाठले आणि घडलेला सर्व प्रकार घरातील पालकांना सांगितला.
दुसरी घटना अशी आहे की उरण जेएनपीटी समोरील कॉलनी मधील एका शिकवणी वर्गात एक अनोळखी इसम जाऊन एका मुलाला घरी घेऊन जाण्यासाठी आलो आहे असे सांगू लागला. लहान मुलाने त्याच्यासोबत जाण्यासाठी नकार दिल्यानंतर शिक्षिकेने लगेच घरी फोन केला. तेव्हा समजले की कोणत्याही माणसाला मुलाला आणायला पाठविले नाही.शिक्षिका फोनवर बोलत असताना त्या अनोळखी माणसाला संशय आला आणि तो तेथून पळून गेला. त्यामुळे सर्व पालकांना विविध सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांनी विनंती केली आहे की सध्या सतर्क रहा. शाळेतून किंवा ट्युशन मधून मुलांना आणण्यासाठी उशीर होत असेल तर तसे वर्गातील शिक्षकांना फोन करून कळवा.शाळेत मुलाला सोडेपर्यंत व शाळा सुटल्यानंतर आपल्या मुलावर पालकांनी विशेष लक्ष द्यावे.अशी विनंती विविध सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांनी पालकांना केली आहे.