राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत उद्या आरोग्य कोशाचे प्रकाशन
नामांकित आंतरराष्ट्रीय विद्यापीठांसमवेत होणार आरोग्य विद्यापीठाचा सामंजस्य करार
मुंबई : आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण शिल्पकार चरित्रकोशातील ‘आरोग्य कोशाचे’ प्रकाशन व नामांकित आंतरराष्ट्रीय विद्यापीठांसमवेत आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा सामंजस्य करार कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात गुरुवारी 14 जुलै 2022 रोजी करण्यात आले आहे.
विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ संपन्न होणार असून कार्यक्रमास वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे उपमुख्यमंत्री रॉजर कुक, वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे आंतरराष्ट्रीय शिक्षणमंत्री डेव्हिड टेम्पलमन, युनिर्व्हसिटी ऑफ नॉटे डेम ऑस्ट्रेलियाच्या प्रति-कुलगुरु प्राध्यापिका सेलमा अलिक्स, कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते आधुनिक महाराष्ट्राची जडण-घडण शिल्पकार चरित्रकोशातील आरोग्य कोशाचे प्रकाशन करण्यात येणार असून या आरोग्य कोशात आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींची थोडक्यात माहिती आदींचा समावेश आहे. या आरोग्य कोशात सुमारे 550 पेक्षा अधिक चरित्रनायकांचा समावेश करण्यात आला असून विद्याशाखानिहाय ते वर्गीकृत करण्यात आले आहेत. प्रकाशित करण्यात येणारा आरोग्यकोश शिक्षक, विद्यार्थी व अभ्यागतांकरिता उपयुक्त असणार आहे. तसेच या कार्यक्रमात आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि युनिव्हर्सिटी ऑफ नॉट्रे डेम ऑस्ट्रेलिया यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार आहे. या करारांतर्गत शिक्षणाकरिता आंतरराष्ट्रीय धोरणात्मक मूल्यानुसार संबंधित विषयांमधील तज्ञांना प्रोत्साहन देणे, विद्यार्थी आणि कर्मचारी गतिशीलतेसाठी संधी वाढवणे, आंतरराष्ट्रीय संशोधन सहकार्य मजबूत करणे, विद्यापीठ संसाधने आणि सुविधांच्या परस्पर विनिमयासाठी प्रक्रिया सुरू करणे, उच्च दर्जाचे शिक्षण आणि संशोधन संदर्भात जागरूकता वाढविणे आदी बाबींचा समावेश असणार आहे.
शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर महत्वपूर्ण असून आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार असून आरोग्य सेवा क्षेत्रात उदयोन्मुख तंत्रज्ञान-आधारित प्रतिबद्धता आणि उपक्रम तयार करण्यासाठी कार्य करण्यात येणार आहे. हेल्थकेअर क्षेत्रातील संभाव्य क्षेत्रे ज्यामध्ये सहकार्य करू शकतात अशा मॉडेलद्वारे आरोग्य सेवा वितरण सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाच्या नेतृत्वाखाली रिमोट हेल्थकेअर उपाय, रुग्णांची काळजी, प्रयोगशाळा, वैद्यकीय शिक्षण व प्रशिक्षण आदी बाबींचा यात समावेश असणार आहे.
विद्यापीठातील वैद्यकीय इतिहास संग्रहालयाचे नूतनीकरण करण्यात येणार असून केंद्र शासनाच्या वाणिज्य मंत्रालयांतर्गत कार्य करणारे अहमदाबाद येथील नॅशनल डिझाईन संस्थानसमवेत सामंजस्य करार करण्यात येणार आहे. या करारानुसार कामाचे तीन टप्पे असून पहिल्या टप्प्यात वैद्यकीय इतिहास संग्रहालय पुनर्विकासासाठी आवश्यक मूल्यमापन आणि योजना तयार करण्यात येणार आहेत दुसऱ्या टप्प्यात संग्रहालयाची संकल्पना आणि रचना तसेच अंतीम टप्प्यात संग्रहालयास मूर्त रुप देण्यात येणार आहे. आरोग्य शिक्षण व संशोधनासाठी शिक्षक, विद्यार्थी व अभ्यागतांना माहितीसाठी विद्यापीठ आवारातील संग्रहालय महत्त्वपूर्ण असणार आहे.
मलबार हिल मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात सकाळी 11.00 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.