हरिहरेश्वरहून हर्णे बंदरात येणारी मासेमारी नौका बुडाली
दापोली : दापोली तालुक्यात हर्णे बंदरामध्ये एका नौकेला जलसमाधी मिळाल्याने नौका मालकाचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत सुदैवाने जीवित हानी मात्र टळली आहे. रायगडच्या हद्दीतील हरिहरेश्वरमधून दापोली तालुक्यातील हर्णे बंदराकडे येतााना शनिवारी दुपारी ही दुर्घटना घडली.
हर्णे बंदरात मासेमारी करणारी उटंबर येथील चांगा दामा भोईनकर यांची ‘दोन सिलिंडरची नौका गुरुवार दि. 5 मे 2022 रोजी रात्री उशिरा हर्णै बंदरातून मासेमारीचे साहित्य भरून समुद्रात मासेमारीसाठी गेली होती. बोटीवर चांगा भोईनकर तसेच त्यांचा मुलगा नंदकुमार असे दोघेच नौकेवर होते. दि. 7 मे रोजी सकाळी हे दोघेही हरेश्वररध्ये मासेमारी करीत होते. त्याचवेळी अचानक नौकेवरील मशीन बंद पडले. त्यामुळे त्यांनी तेथे जवळच असलेल्या पाजपंढरी येथील बोटीच्या मदतीने बोट हर्णे बंदराच्या दिशेने आणली जात असताना ही दुर्घटना घडली. प्रतिकूल हवामानामुळे लाटांचा तडाखा बसून ही बोट बुडाली. यात नौका मालकाचे सुमारे 5 ते 6 लाखांचे नुकसान झाले आहे