नवी मुंबई, दि. ३ : कोकण विभागातील जिल्हयांमध्ये असलेल्या 25 रोपवाटीकांमध्ये 32 लाख 42 हजार रोपे सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत. 15 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत वनमहोत्सव साजरा केला जाणार असून नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.
माहे जून ते सप्टेंबर हे पावसाचे महिने असल्याने या कालावधीत वृक्षलागवड केल्यास त्यांना नैसर्गिकरित्या मुबलक स्वरुपात पाणी मिळते त्यामुळे लागवड केलेली रोपे सहजतेने जगतात. या कालावधीत जनतेला वनीकरणाचे महत्व पटावे, वृक्षलागवडीबद्दल उत्साह वाढावा, नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात वृक्षलागवड करावी या उद्देशाने वन विभागामार्फत सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध करुन वन महोत्सव साजरा केला जातो. कोकण विभागातील समाजिक वनीकरण वृत्त ठाणे अंतर्गत येणाऱ्या ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग या भागांमध्ये दि. 15 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत वनमाहेत्सव साजरा करण्यात येत आहे.
या वनमहोत्सवात सवलतीच्या दरात रोपं उपलब्ध आहेत. या मध्ये 9 महिन्याचे अ दर्जाचे एक रोप जे सर्वसाधारण कालावधीत 31 रुपयात मिळते ते रोप या वन महोत्सवा दरम्यान 20 रुपयात उपलब्ध आहे. ब दर्जाचे 25 रुपयात मिळणारे रोप 12 रुपयात, क दर्जाचे 23 रुपयात मिळणारे रोप 10 रुपयात उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे 18 महिन्याचे अ दर्जाचे एक रोप जे सर्वसाधारण कालावधीत 79 रुपयात मिळते ते रोप 50 रुपयात, ब दर्जाचे 63 रुपयात मिळणारे रोप 30 रुपयात, क दर्जाचे 57 रुपयात मिळणारे रोप 25 रुपयात उपलब्ध आहे. तसेच 18 महिन्यांवरील अ दर्जाचे एक रोप जे सर्वसाधारण कालावधीत 135 रुपयात मिळते ते रोप 65 रुपयात, ब दर्जाचे 103 रुपयात मिळणारे रोप 50 रुपयात, क दर्जाचे 92 रुपयात मिळणारे रोप 40 रुपयात उपलब्ध आहे. या वर्षी रोपे निर्मितीवेळी, बियाणांचा स्त्रोत, बियाणांची प्रतवारी व उपचार, रोपांची सुदृढता या सर्व गोष्टींवर विशेष लक्ष दऊन कृषि तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही रोपे तयार करण्यात आली आहेत.
रत्नागिरीत ८ तर सिंधुदुर्गात २ रोपवाटिका उपलब्ध
ठाणे जिल्हयात 9, रायगड 6, रत्नागिरी 8 आणि सिंधुदूर्ग 2 अशा कोकण विभागात एकूण 25 रोपवाटीका उपलब्ध आहेत. या सर्व रोपवाटींकांमध्ये एकूण 32 लाख 42 हजार रोपे विक्रीसाठी तयार करुन ठेवण्यात आली आहेत.
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध असलेल्या महसूल व वन विभागाचा शासन निर्णय क्र. साववि-2023/प्र.क्र.44/फ-11/दि.28/06/2023 पाहावा.
ज्या शासकीय यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था इत्यादींना वृक्ष लागवड करावयाची आहे. अशा यंत्रणांकडे रोप निर्मितीसाठी कोणत्याही प्रकारची आर्थिक तरतूद नसल्यास, अशा यंत्रणांना या वन महोत्सव कालावधीत रोपांचा मोफत पुरवठा संबंधित रोपवाटिकेत केला जाईल. यासाठी अशा यंत्रणांनी लागणाऱ्या रोपांची आगाऊ मागणी उपवनसंरक्षक (प्रादेशिक) किंवा विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग यांच्याकडे विहित मागणीपत्राव्दारे करावी.
वन महोत्सवा दरम्यान उपलब्ध असलेल्या सवलतीच्या दरातील रोपांची खरेदी करुन खाजगी मालकीचे पडीक क्षेत्र, शेत बांधावर, रेल्वे दूतर्फा, कालवा दुतर्फा, रस्ते दूतर्फा क्षेत्रात, सामूहीक पडीक क्षेत्र, गायरान क्षेत्र अशा ठिकाणी मोठया प्रमाणात जास्ती जास्त नागरिकांनी वृक्षलागवड करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.
हेही वाचा : Konkan Railway | गणेशोत्सवासाठी दिवा-रत्नागिरी मार्गावर यंदा प्रथमच मेमू स्पेशल धावणार!