- डी. गुकेश, मनू भाकर, हरमनप्रीत सिंग सुवर्णपदक विजेता प्रविण कुमार यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार
नवी दिल्ली : राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार आज जाहीर झाले आहेत. वर्ल्ड चेस चॅम्पियन डी. गुकेश, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दुहेरी पदक विजेती मनू भाकर, भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरिस पॅरालिम्पिकमधील सुवर्णपदक विजेता प्रविण कुमार यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान केला जाईल.
एकूण 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देण्यात येणार आहे. यात धावपटू ज्योती याराजी आणि अन्नू राणी, बॉक्सर नितू आणि सविती, चेस खेळाडू वंतिका अग्रवाल, हॉकी खेळाडू सलीमा टेटे, अभिषेक, संजय, जरमनप्रीत सिंग आणि सुखजीत सिंग यांचा समावेश आहे. तसेच पॅरा-आर्चर राकेश कुमार, पॅरा-धावपटू प्रीती पाल, जीवनजी दीप्ती, अजीत सिंग आणि सचिन खिलारी यांनाही अर्जुन पुरस्कार मिळणार आहे.
ज्येष्ठ धावपटू सुचा सिंग आणि ज्येष्ठ पॅरा जलतरणपटू मुरलीकांत पेटकर यांना अर्जुन पुरस्कार (आयुष्यभराच्या योगदानासाठी) देण्यात येईल.
पॅरा-शूटिंग प्रशिक्षक सुभाष राणा, शूटिंग प्रशिक्षक दीपाली देशपांडे, हॉकी प्रशिक्षक संदीप सांगवान, बॅडमिंटन प्रशिक्षक एस. मुरलीधरन आणि फुटबॉल प्रशिक्षक आर्मांडो एग्नेलो कोलासो यांना द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित केले जाईल.
फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया यांना राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार देण्यात येईल.
चंदीगड विद्यापीठ, लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ आणि गुरु नानक देव विद्यापीठ, अमृतसर यांना मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी मिळणार आहे.
पुरस्कार विजेत्यांना 17 जानेवारीला राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येईल.