रत्नागिरी, दि. २४ (जिमाका) : ग्रामीण भागामध्ये जन्म-मृत्यू ऑनलाईन नोंदणी करण्याचे प्रमाण ३३ टक्के आहे. हे प्रमाण १०० टक्के वाढविण्यासाठी प्रयत्न करा, अशी सूचना जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.
जन्म-मृत्यू नोंदणी विषयक जिल्हास्तरीय समन्वय समितीची सभा दूरदृश्यश प्रणालीद्वारे झाली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार उपस्थित होते. जिल्हयातील सर्व गटविकास अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी स्वागत, प्रास्ताविक करुन संगणकीय सादरीकरण केले.
जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले सीआरएस पोर्टलवर नगर परिषद, नगर पंचायत, सामान्य, उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र १०० टक्के नोंदणी करीत आहेत. संगणक प्रणालीद्वारे नोंदणी करण्याबाबत ग्रामसेवकांना सक्त सूचना द्या. तालुकास्तरावर समन्वय समितीच्या सभेचे आयोजन करा, असे आवाहन त्यांनी केले.
रत्नागिरी व मंडणगड वगळता सर्व तालुक्यांचे ऑनलाईन नोंदणी करण्याचे प्रमाण खूपच कमी असल्याचे सांगून मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुजार यांनी पंचायत समितीनिहाय ऑनलाईन नोंदणी वाढविणे आवश्यक असल्याचे सांगितले.