- कै मृणाल हेगशेट्ये राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा २०२३
रत्नागिरी : ना हिंदू धर्म धोक्यात, ना मुस्लिम धर्म धोक्यात. धोक्यात आहे ती मानवता. आज जाती धर्मावरून समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. महापुरुषांबद्दल गैरसमज पसरवले जात आहेत. विद्वेषाचा वणवा पेटत असताना संतांनी सांगितलेला समतेचा, माणुसकीचा विचार पसरवण्याची गरज आहे. ही ताकद वक्तृत्वात आहे. कै मृणाल हेगशेट्ये वक्तृत्व स्पर्धेतून मानवता, समता, बंधुभाव जोपासण्याचे, संविधान वाचवण्याचे वारकरी व्हावे असे आवाहन महाराष्ट्रातील ख्यातनाम प्रबोधनकार ह. भ. प.शामसुंदर सोन्नर महाराज यांनी केले.
ते मृणाल हेगशेट्ये स्मृती आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ समाजवादी नेत्या कमल ताई परुळेकर, नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये, सेक्रेटरी परेश पाडगावकर, प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, संचालक संचालिका सीमा हेगशेट्ये, ऋतुजा हेगशेट्ये, परीक्षक प्रा. कैलास गांधी, प्रा. अदिती मुळे, दीप्ती कानविंदे, अभिजीत बिरनाळे,श्री.नथुराम देवळेकर,सौ.रश्मी कशेळकर, उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना हभप शामसुंदर सोन्नर महाराज यांनी स्त्री शक्तीचा जागर केला. महिलांना ज्यावेळी संधी मिळाली त्यावेळी त्यांनी कर्तृत्व सिद्ध केले. संत जनाबाई यांचा दाखला देत 34 वर्ष वयाच्या जनाबाईंनी वारकरी संप्रदायाचे नेतृत्व केले. इंदिरा गांधींनी थेट घुसून पाकिस्तानला धडा शिकवला. भारतीय संविधानाने स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार केला म्हणूनच अमेरिकेपेक्षा भारतीय संविधान हे प्रगत आहे. अमेरिकेमध्ये महिलांना मतदानाचा हक्क मिळण्यासाठी 27 वर्ष संघर्ष करावा लागला. आज अमेरिकेच्या इतिहासात एकही महिला राष्ट्राध्यक्ष झाली नाही. यातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाची ताकद समजते. हे भारतीय संविधान सर्वांनी एकजुटीने संरक्षण करणे गरजेचे आहे. आपण संविधानाचे संरक्षण केले तरच संविधान आपले संरक्षण करेल असे त्यांनी सांगितले.
यावेळी जेष्ठ समाजवादी नेत्या कमलताई परुळेकर यांनी क्षमतांना योग्य वाव देणे याला समाजवाद म्हणतात. तो समाजवाद अभिजीत हेगशेट्ये यांनी निर्माण केला आहे असे सांगितले. आजची पिढी सुशिक्षित असली तरी त्यांच्याकडून घटनांचे योग्य विवेचन होते का हा मोठा प्रश्न आहे. आज आजूबाजूला विचित्र परिस्थिती निर्माण केली जात आहे. संभ्रम निर्माण केला जात आहे. हा संभ्रम वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच नवे विचार ऐकून दूर होऊ शकतो असे त्या म्हणाल्या.
मणिपूर घटने बद्दल बोलताना कमल ताई यांनी जिथे जळते बाई तिथे संस्कृति नाही असे अधोरेखीत करून ज्या देशात स्त्रीची पूजा केली जाते त्या देशात महिलांची नग्न धिंड काढली जाते हे खूप मोठे पाप आहे. सुडातून देशाचा विकास होणार नाही. देशाला सहिष्णुतेचा विचार प्रगतीपथावर नेईल. हे सांगताना त्यांनी नेल्सल मंडेला यांचं उदाहरण सांगितले.
यावेळी अभिजीत हेगशेट्ये, प्रा. कैलास गांधी, अभिजीत बिरनाळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन टेकाळे व आभार प्रदर्शन प्राचार्य डॉ. आशा जगदाळे यांनी मानले.