https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

अखंड भारत संकल्प दिनानिमित्त रत्नागिरीत भव्य मशाल रॅली संपन्न

0 111


रत्नागिरी, २० ऑगस्ट : अखंड भारत संकल्प दिनानिमित्त १४ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी रत्नागिरी शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने स्वातंत्र्यलक्षमी चौक ते जयेश मंगल पार्क अशी भव्य मशाल रॅली संपन्न झाली. या रॅलीमध्ये साडेतीनशेहून अधिक वाहने भगव्या ध्वजांसह सहभागी झाली होती. मशाल रॅली नंतर शिवशंभू विचारमंच कोकण प्रांताचे सहसंयोजक श्री. अभय जगताप यांचे जयेश मंगल पार्क येथे व्याख्यान झाले.

मशाल रॅलीचा प्रारंभ करतांना श्री. अभय जगताप, सहसंयोजक, शिवशंभू विचारमंच कोकण प्रांत


मशाल रॅलीच्या प्रारंभी स्वातंत्र्य लक्ष्मी चौक येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला सर्वश्री अभय जगताप, शुभम जोशी आणि ययाती शिवलकर यांनी पुष्पहार अर्पण केला. श्री. केशव भट यांनी श्रीफळ वाढवले. यानंतर श्री. अभय जगताप यांच्या हस्ते मशाल प्रज्ज्वलित करण्यात आली. यानंतर मशाल रॅलीला सुरुवात होऊन सिव्हिल हॉस्पिटल जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला श्री. अभय दळवी यांनी पुष्पहार अर्पण केला. रॅली मारुती मंदिर येथे आल्यावर तेथे छत्रपती शिवाजी महाराज यांना श्री. तेजस साळवी यांनी पुष्पहार अर्पण केला. मशाल रॅलीची सांगता जयेश मंगल पार्क माळका येथे झाली.

मशाल रॅली प्रसंगी मार्गदर्शन करताना श्री. अभय जगताप, सहसंयोजक, शिवशंभू विचारमंच कोकण प्रांत


अखंड भारताच्या निर्मितीसाठी छत्रपती शिवरायांच्या विचारांचे अनुकरण आवश्यक
उपस्थितांना मार्गदर्शन करताना शिवशंभू विचारमंचच्या कोकण प्रांताचे सहसंयोजक श्री. अभय जगताप म्हणाले की, आपल्याला एक समर्थ भारत घडवायचा आहे, त्यासाठी अखंड भारत आम्हाला निर्माण करायचा आहे. या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत. ज्यावेळी आम्ही समर्थ म्हणून स्वाभाविकरीत्या अखंड बनू. अखंड बनलो तर समर्थ बनू. विष्णू पुराणात भारतभूचा उल्लेख आहे. आताचा पाकिस्तान, बांगलादेश, पाकव्याप्त काश्मीर, अफगाणिस्तान, तुर्कस्तान, ब्रह्मदेश, श्रीलंका, तिबेट, भूतान आदी मिळून अखंड भारत पूर्वी अस्तित्वात होता. अखंड भारत पुन्हा निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या मार्गावरूनच आपल्याला पुढे जावे लागेल. छत्रपती शिवरायांचे गुण आत्मसात करून सारे भेद विसरून सकल हिंदू समाज म्हणून जेव्हा आम्ही उभे राहून तेव्हा अखंड भारत पुन्हा अस्तित्वात येऊ शकेल, असेही श्री. जगताप म्हणाले.

श्री. अभय जगताप, सहसंयोजक, शिवशंभू विचारमंच कोकण प्रांत.


यानंतर जयेश मंगल पार्कच्या सभागृहात श्री. अभय जगताप यांचे व्याख्यान झाले. व्याख्यानाच्या प्रारंभी सर्वश्री अभय जगताप, डॉ. महेंद्र पाध्ये आणि अभय दळी यांनी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन केले. श्री. अभय जगताप यांचे स्वागत श्री. अभय दळी यांनी केले. डॉ. महेंद्र पाध्ये यांचे स्वागत श्री राकेश नलावडे यांनी केले. सौ. श्रुती काटे यांनी म्हटलेल्या वंदेमातरम गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. चंद्रकांत राउळ यांनी केले. कार्यक्रमाला सर्वश्री प्रशांत कदम, ओंकार रहाटे, संजय जोशी, रवींद्र भुवड, संतोष पावरी, राजेश सावंत, बाळ माने आदींसह ३०० हून अधिक जण उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.