रायगड भूषण संगीताताई ढेरे यांचा साई मंदिर वहाळच्या वतीने साई सन्मानाने गौरव
उरण (विठ्ठल ममताबादे ) : आजच्या आधुनिक युगातल्या सावित्रीच्या लेकीं,जिजाऊंच्या लेकीं खऱ्या अर्थाने स्त्री सक्षमीकरणाचा आणि स्त्री-पुरुष समानतेचा आदर्श निर्माण करत समाजात एक नवा अध्याय रचतानां दिसत आहेत आणि म्हणूनच असं कुठलंच क्षेत्र नाही जिथे नारीशक्ती मागे आहे. याचं एक प्रेरणादायी उदाहरण पाहायला मिळतं ते उरण येथील श्री समर्थकृपा सखी स्वयंसाहायता संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा संगीताताई सचिन ढेरे ज्यांनी स्त्रियांच्या प्रगतीस पोषक वातावरणाची निर्मिती केली.
स्त्रीशक्तीने स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभं राहावे. स्त्रीशक्तीच सक्षमीकरण व्हावं ! म्हणून श्री समर्थ कृपा सखी स्वयं सहायता संस्थेच्या वतीने अनेक महिला भगिनींना स्वयंरोजगाराचा अनेक संधी उपलब्ध करून देत त्यांना सक्षम बनवले.आणि ह्याच सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून साकारलेल्या अनेक समाजपयोगी कार्याची दखल घेत संगिताताई ढेरे यांना मागच्याच महिन्यात रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणारा मानाचा पुरस्कार रायगड भूषण हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या ह्याच कार्याची दखल घेत आज श्री साई देवस्थान साई मंदिर वहाळ येथे साई देवस्थान वहाळचे संस्थापक अध्यक्ष रविशेठ पाटील ,पार्वतीताई पाटील,सामाजिक कार्यकर्ते राजू मुंबईकर यांच्या शुभहस्ते साई मंदिर वहाळच्या वतीने संगिताताई ढेरे यांना साई सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित केले. हा सन्मान प्रदान करतांना रविशेठ पाटील म्हणाले की आपणां सारख्याच्यां योगदानातून आज ही चांगला समाज उभा राहत आहे आणि राहील यात शंका नाही. समाजाप्रती असलेल्या आपल्या समर्पक भावनेसाठी व आपल्या अलौकिक कार्यासाठी आम्हीं मनापासुन शुभेच्छा देतो या पुढे आपल्या हातून अशीच समाजसेवा घडत राहो, असं म्हणत आपलं मनोगत व्यक्त करत साई मंदिर वहाळ येथे संगिताताई ढेरे यांना साई सन्मानाने सन्मानित करण्यात आले.