संगीत शिक्षक विजय रानडे ठरले रत्नागिरीतील पहिले ‘हार्मोनियम अलंकार’
रत्नागिरी : रत्नागिरीमधील प्रसिद्ध संगीत शिक्षक, हार्मोनियम वादक, संगीतकार विजय रानडे हे रत्नागिरीतील पहिले “हार्मोनियम अलंकार” पदवीप्राप्त हार्मोनियम वादक ठरले आहेत. विजय रानडे यांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय (मुंबई) या संस्थेच्या देवल संगीत विद्यालय, (कोल्हापूर) केंद्रात घेतल्या गेलेल्या हार्मोनियम वादनामधील अलंकार या पदवी परीक्षेत हे सुयश प्राप्त केले.
एप्रिल महिन्यात ही परीक्षा होती. नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून विजय रानडे ही परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. संगीत क्षेत्रात या पदवीला विशेष महत्त्व आहे. हार्मोनियम वादनात विजय रानडे हे जिल्ह्यात अलंकार पदवी प्राप्त पहिले शिक्षक बनले आहेत.
ते गेल्या २० वर्षांपासून हार्मोनियम वादन करत असून ते जीजीपीएस शाळेत संगीत शिक्षक आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी अनेक कार्यक्रमांना साथसंगत केलेली आहे. हार्मोनियम वादनाचे बाळकडू व शिक्षण घरातच वडील (कै.) विनायकबुवा तसेच प्रसिद्ध ऑर्गनवादक (कै.) पं. तुळशीदास बोरकर यांच्याकडून घेतले. आपल्या वडील व काकांच्या पश्चात रत्नागिरीतील पहिल्या संगीत विद्यालयाची धुरा ते यशस्वीपणे सांभाळत आहेत.