रत्नागिरी : रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरावरचे अतिक्रमण हटवण्यास मंगळवारी सकाळपासूनच सुरूवात झाली आहे. एकूण 303 झोपड्या, स्टॉल, शेड, बांधकामे काढली जाणार आहेत. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास पोलिस, सुरक्षा रक्षक आणि होमगार्डचा फौजफाटा बंदरावर दाखल झाला. पोलिसांचे संचलन झाल्यानंतर अतिक्रमण हटाव कारवाईला प्रारंभ झाला. प्रांत जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे आणि सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभाग अधिकार्यांच्या उपस्थितीत ही कारवाई सुरू होती.
मिरकरवाडा बंदरावरील जेटीलगतच्या जागेची मालकी सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाची आहे. याठिकाणी शेकडो अनधिकृत स्टॉल, झोपड्या, कावण आणि बांधकामे करण्यात आली होती. ही बांधकामे काढून टाकण्याबाबतच्या नोटीस बजावण्यात आल्या होत्या. काही नोटीस संबंधित व्यक्तींना देण्यात आल्या तर काही नोटीस त्या-त्या झोपड्या, स्टॉल, बांधकामांवर चिटकवण्यात आल्या होत्या. या अंतिम नोटीसद्वारे 16 ऑक्टोबरपर्यंत अनधिकृत किंवा अतिक्रमण झालेल्या झोपड्या, बांधकामे काढण्यात सांगण्यात आले. परंतु, त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही.
नोटीसची मुदत गेल्या सोमवारी संपुष्टात आल्यानंतर मंगळवारी सकाळपासून कारवाई करण्यात आली. प्रांत, तहसीलदार, मत्स्य व्यवसाय विभागाचे अधिकारी रत्नाकर राजम, जीवन सावंत यांच्या उपस्थितीत आणि पोलिस बंदोबस्तात ही कारवाई सुरू झाली. जिल्हाधिकार्यांच्या सूचनेनुसार रत्नागिरी नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी या कारवाईवेळी उपस्थित होते.
मंगळवारी सकाळी जेसीबीच्या मदतीने कारवाई सुरू झाल्यानंतर प्रथम काहीजणांकडून विरोध होऊन अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करून सर्व यंत्रणांनी अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच ठेवली. त्यानंतर झोपड्या, शेड, स्टॉलमधील साहित्य काढून घेण्याची मुभा मिळण्याची विनंती होऊ लागली. ही विनंती मान्य करण्यात आली. त्यांना सामान न्यायचे होते त्यांना सामान काढून घेण्याची मुभा देण्यात आली. ज्यांनी सामान काढले नाही त्यांचे सामान ट्रकने उचलून मत्स्य विभागाच्या आवारात नेऊन ठेवले जात होते. तब्बल 303 अतिक्रमणे काढायची असल्याने पुढील तीन-चार दिवस ही कारवाई सुरूच राहणार आहे.