‘मेरी मिट्टी, मेरा देश’ कार्यक्रमात महाविद्यालयाचा सहभाग
रत्नागिरी : देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ‘पंचप्राण’ आणि ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि भारताच्या मातृभूमीबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी एनएसएसच्या सहकार्याने महाराष्ट्रात मेरी माती मेरा देश अभियान उत्साहाने राबवले जात आहे. या मोहिमेत एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी सहभाग घेत शहीदांना श्रद्धांजली वाहिली.
महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित या उपक्रमात सर्व विद्यार्थी आपल्या घर परिसरातील माती गोळा करून अमृत कलशात टाकून या मोहिमेत सहभागी झाले. हे अभियान संपूर्ण भारतभर होत आहे. या कार्यक्रमात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. केंद्र शासनाने केलेल्या आवाहनानुसार सहभागी सर्वांनी सेल्फी घेऊन शासनाच्या वेबसाईटला अपलोड केली.
या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. आशा जगदाळे, राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यक्रमाधिकारी प्रा. सुशील साळवी, कला शाखा प्रमुख डॉ. पूजा मोहिते, मराठी विभागप्रमुख प्रा. योगेश हळदवणेकर यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.