रत्नागिरी : “मत्स्य पदवी धारकांनी व्यावसायभिमुख शिक्षण प्राप्त करून आपला व्यवसाय उभारावा आणि त्यातून इतरांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. म्हणजेच नोकरी मिळविण्यापेक्षा नवीन नोकऱ्या निर्माण करणारे विद्यार्थी घडले तरच हे व्यावसायिक शिक्षण घेतल्याचे सार्थक होईल”, असे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली चे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी केले. ते मत्स्य महाविद्यालय, शिरगांव, रत्नागिरी च्या ४३व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
“महाविद्यालयातील प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांनी मत्स्य व्यवसायिक आणि मत्स्य शेतकऱ्यांना उपयुक्त संशोधन करून त्यांच्या अन्न सुरक्षा, रोजगार सुरक्षेसाठी योगदान द्यावे” अशी अपेक्षा डॉ. भावे यांनी व्यक्त केली.
गेल्या वर्षभरात शैक्षणिक, संशोधन, विस्तार शिक्षण, सामाजिक, कला-क्रीडा या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांना कुलगुरू डॉ. भावे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. महाविद्यालयातील नऊ विद्यार्थी राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET) तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त व मत्स्य विकास अधिकारी पदाच्या परिक्षेत महाविद्यालयाचे अनुक्रमे ४२ व ३६ विद्यार्थी पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल डॉ. भावे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना अंतिम निवडीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी व्यासपीठावर विशेष अतिथी डॉ. एन. पी. साहू, सहसंचालक केंद्रीय मात्स्यिकी शिक्षण संस्था मुंबई व प्रमुख पाहुणे डॉ. श्रीपादा ए. आर., वरिष्ठ शास्त्रज्ञ, राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था, गोवा तसेच महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश शिनगारे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश शिनगारे यांनी केली. त्यात त्यांनी महाविद्यालयाच्या गेल्या ४२ वर्षातील घडामोडींचा आढावा घेतला. तसेच गेल्या वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांचे विशेष कौतुक केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ.एन. पी. साहू, डॉ. श्रीपादा ए. आर. तसेच कुलगुरू पदी नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच भेट देणाऱ्या डॉ. संजय भावे यांचा यथोचित सत्कार महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आला. डॉ. भावे सरांच्या कार्याची तसेच महाविद्यालयाची थोडक्यात माहिती देणारे दोन स्वतंत्र माहितीपटांचे सादरीकरण याप्रसंगी करण्यात आले. महाविद्यालयाचे माजी सहयोगी अधिष्ठाता डॉ. शेखर कोवळे यांनी पाठवलेला शुभेच्छा संदेशाचे वाचन याप्रसंगी करण्यात आले.
कार्यक्रमाला माजी विभागप्रमुख डॉ. मनोहर चांडगे, डॉ. विजय निंबाळकर, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी चे माजी प्राचार्य व डॉ. भावे सरांचे गुरू डॉ. अजिज पठाण, डॉ. नितीन सावंत, डॉ. विजय दळवी, डॉ. किरण मालशे, डॉ. आनंद हणमंते, डॉ. अनिल पावसे, डॉ. बाळासाहेब चव्हाण, डॉ. स्वप्नजा मोहिते, डॉ. मिलिंद सावंत आदी उपस्थित होते.
त्यानंतरच्या व्याख्यानमालेच्या तांत्रिक सत्रात डॉ.एन. पी. साहू यांनी “जागतिक अन्न सुरक्षेसाठी मत्स्य संवर्धनातील संधी” तर डॉ. श्रीपादा ए. आर. यांनी “समुद्री घोडे: किनारी सागरी जैवविविधतेसाठी प्रमुख प्रजाती” याविषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. वक्त्यांची ओळख डॉ. आसिफ पागारकर व डॉ. केतन चौधरी यांनी करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुहास वासावे यांनी तर आभार डॉ. सुरेश नाईक यांनी मानले.
कार्यक्रमासाठी मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगांव, कृषी विज्ञान केंद्र, लांजा, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, कृषी संशोधन केंद्र, शिरगांव आणि मत्स्य संशोधन केंद्र, मुळदे, कुडाळ येथील प्राध्यापक, संशोधक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
हेही वाचा :
Konkan Railway | गणेशोत्सवासाठी दिवा-रत्नागिरी मार्गावर यंदा प्रथमच मेमू स्पेशल धावणार!