पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसने सर्वाधिक १४३ प्रवासी उतरले रत्नागिरीत!
पहिल्या फेरीची दुसऱ्या क्रमांकाची प्रवासी संख्या मडगावची
रत्नागिरी : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्यातील मडगाव दरम्यान प्रवाशांना घेऊन आज (बुधवारी ) प्रथमच धावलेल्या वंदे भारत एक्सप्रेसने (२२२२९) रत्नागिरी स्थानकापर्यंत सर्वाधिक १४३ प्रवाशांनी या हायटेक गाडीने पहिला प्रवास केला. त्या खालोखाल १०५ प्रवाशांनी मडगावपर्यंतच्या प्रवासासाठी पहिल्या फेरीची तिकीट बुक केली.
मंगळवारी सकाळी पंतप्रधानांनी मडगाव ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मार्गावर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर आज दिनांक 28 जून 2023 रोजी मुंबई सीएसटी – मडगाव अशी पहिली ‘कमर्शियल रन’ झाली.
कोकण रेल्वे मार्गावरील बंदे भारत एक्सप्रेसच्या या पहिल्या फेरीवेळी रत्नागिरीला चेअर कार डब्यातून 141 तर एक्झिक्युटिव्ह चेअर कारमधून दोन अशा एकूण 143 प्रवाशांनी पहिला प्रवास केला. पहिल्या फेरीच्या अधिकृत प्रवासी तक्त्यानुसार त्या खालोखाल मडगावपर्यंत 92 प्रवाशांनी चेअर कारमधून तर 19 जणांनी एक्झिक्युटिव्ह चेअर कार मधून असा मडगावपर्यंत एकूण १०५ प्रवाशांनी पहिला प्रवास केला. मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसने खेडपर्यंत 41 प्रवाशांनी चेअर कारमधून तर सहा जणांनी एक्झिक्युटिव्ह चेअर कारमधून असा एकूण 47 जणांनी वंदे भारत एक्सप्रेस चा पहिला प्रवास केला.
या गाडीतून सिंधुदुर्गातील कणकवली स्थानकावर 86 जणांनी चेअर कारची तर चार जणांनी एक्झिक्यूटिव्ह चेअर कारची अशा एकूण 90 प्रवाशांनी पहिल्या डाउन वंदे भारत एक्सप्रेसची कणकवली पर्यंतच्या प्रवासाची तिकिटे बुक केली.