रत्नागिरी : मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांकडून अपेक्षेपेक्षा किती तरी चांगला प्रतिसाद मिळत आहे. येत्या गणेशोत्सवातील दोन्ही बाजूंच्या मिळून एकूण नऊ दिवसांच्या फेऱ्या या आताच हाउसफुल्ल झाल्या आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टीमुळे गोव्यातून मुंबईकडे जाणाऱ्या दि. 15 व 17 ऑगस्ट रोजीच्या दोन्ही फेऱ्या आधीच हाउसफुल झाल्या आहेत.
मुंबई-सीएसएमटी ते मडगाव (22229) दरम्यानच्या दिनांक 16 व 18 ऑगस्ट 2023 रोजीच्या वंदे भारत एक्सप्रेसच्या फेऱ्या हाउसफुल्ल झाल्या असून या दिवसांसाठी आता वेटिंग लिस्टवरील बुकिंग सुरू झाले आहे. मडगाव ते मुंबई सीएसएमटी (22230) मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसच्या दिनांक 15 तसेच 17 ऑगस्ट 2023 या दिवसासाठी देखील वंदे भारत एक्सप्रेससाठी ही गाडी सुटणाऱ्या गोव्यातूनच प्रतीक्षा यादीवरील तिकिटांची विक्री सुरू झाली आहे.
दरम्यान, तिकीट दर महागडे असल्यामुळे या गाडीने कोण प्रवास करणार अशी ओरड याआधी केली जात होती. मात्र वंदे भारत एक्सप्रेसने अशी ओरड करणाऱ्यांचा अंदाज खोटा ठरवला असून कोकण रेल्वे मार्गावर सुरू होऊन अजून दोन महिने देखील पूर्ण झालेले नसतानाही ही गाडी रेल्वेच्या तिजोरीत चांगलीच भर घालताना दिसत आहे.