अतिवृष्टीबाधितांना यंत्रणांनी तातडीने सहाय्य करावे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मराठवाडा विभागीय बैठकीत सर्वंकष आढावा
औरंगाबादच्या जुन्या पाणीपुरवठा योजनेच्या दुरस्तीसाठी दोनशे कोटींचा निधी
शेतकऱ्यांना तत्परतेने कर्जपुरवठा करावा
औरंगाबाद : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या प्रत्येकाला वेळेत मदत मिळावी यासाठी मराठवाड्यातील बाधित शेतकरी, नागरिकांना तातडीने आवश्यक ते सहाय्य करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. तसेच औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या योजनेच्या दुरुस्तीसाठी 200 कोटींचा निधी देण्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.
विभागीय आयुक्त कार्यालयात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिवृष्टी, पीक परिस्थिती, विकासकामे तसेच इतर विविध बाबींसंदर्भात विभागीय आढावा बैठक घेतली. या बैठकीस केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाणी राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, खासदार इम्तियाज जलील, सर्वस्वी आमदार हरिभाऊ बागडे, प्रदीप जैस्वाल, अब्दुल सत्तार, संजय शिरसाठ, संदीपान भुमरे, अतुल सावे, माजी मंत्री रामदास कदम, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त डॉ.निखील गुप्ता, महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त अस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, सिडकोच्या मुख्य प्रशासक दीपा मुधोळ, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे सह व्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले, विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र निसार तांबोळी, जिल्हा पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया तसेच विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.