कोकण भवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव
डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ दलीतांचे नेते नसून
ते समाजातील सर्व धर्मीयांचे नेते : गृह निर्माण मंत्री
नवी मुंबई : लोकशाही मुल्यांच्या जपणूकीसाठी भारतीय संविधान अत्यंत महत्वाची भुमिका बजावत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ दलीतांचे नेते नसून ते पूर्ण समाजातील सर्व धर्मीयांचे नेते आहेत. कारण त्यांनी लिहीलेल्या संविधानामुळेच हा देश चालत आहे. त्यामुळेच सर्व धर्मीयांना योग्य पध्दतीने जगता येत आहे, असे मत महाराष्ट्र राज्याचे गृह निर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती कोकण भवन यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 131 वा जयंती महोत्सव नवी मुंबईतील कोकण भवन येथे जल्लोषात साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या जयंती महोत्सवाला कार्यक्रमाचे अध्यक्ष वस्तू व सेवा कर सह आयुक्त अपिले महाराष्ट्र राज्य रमेश जैद, कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून विचारवंत आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, एसीपी दत्ता तोडेवार, सार्वजनिक बांधकाम प्रा. विभाग (राष्ट्रीय महामार्ग) कोकण भवनचे मुख्य अभियंता संतोष शेलार, दक्षता व गुण नियंत्रण मंडळाचे अधिक्षक अभियंता सु. ल. टोपले, सार्वजनिक बांधकाम विभाग रायगडचे अधिक्षक अभियंता आर. एम. गोसावी, समाज कल्याण मुंबई विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे, महाराष्ट्र राज्य राजपत्रित महासंघ कोकण भवनचे अध्यक्ष तथा कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे, संकल्प चित्र (सां.बा.) मंडळच्या कार्यकारी अभियंता हे. वा. कांबळे, सहसंचालक, कोकण विभागाचे नगररचनाकार राजेंद्र चौहान, महाराष्ट्र राज्य राजपत्रित महासंघ कोकण भवनचे सचिव तथा कोकण भवनचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश धुमाळ आदि मान्यवर उपस्थित होते.
जयंती महोत्सवाच्या प्रारंभी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा जोतीबा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापूरषांच्या प्रतिमेला पूष्पअर्पणकरुन अभिवादन केले.
यावेळी डॉ. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सध्या देशात अस्थिर वातावरण आहे. परंतु उपलब्ध कायद्यांमुळे महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था उत्तम आहे. हे सर्व बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच शक्य आहे. बाबासाहेबांचे विचार आजही सर्वत्र पोहचविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी बोलून दाखविले.कार्यक्रमाच्या प्रारंभी व्याख्यानात डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एकाच जाती धर्मासाठी कार्य केले नसून, त्यांनी सर्व धर्मातील लोकांचे कल्याण केले आहे. बाबासाहेबांनी सर्व जाती धर्मातील लोकांसाठी केलेले कार्य हे उल्लेखनीय आहे. बाबासाहेबांनी केलेल्या त्यागाची प्रत्येक भारतीयांनी जाणीव ठेवणे आवश्यक आहे. यावेळी डॉ. सबनीसांनी बाबासाहेबांचे ऐतिहासिक किस्से आणि घटणा सांगितल्या.
पुराभिलेख संचालनालय, मुंबई यांनी तयार केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनदर्शनाचे चित्रमय प्रदर्शन या जयंती महोत्सवस्थळी लावण्यात आले होते. या महोत्सवासाठी आलेल्या आणि कोकण भवनात येणाऱ्या नागरिकांसाठी हे प्रदर्शन आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी कार्यक्रम स्थळी पोहचल्यावर प्रथमत: प्रदर्शनाची पाहणी केली. प्रदर्शनात लावण्यात आलेल्या बाबासाहेबांच्या दूर्मिळ दस्ताएवजांच्या चित्रमय पॅनल्सचे बारकाईने निरिक्षण केले.
सकाळी 10.00 ते दूपारी 2.00 या वेळेत आचार्य श्री नानेश हॉस्पिटलच्या वतीने सर्वांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन तसेच ओंकार प्रस्तूत भिम वंदना भीमगितांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव कोकण भवन समितीच्या आजी-माजी तसेच विशेष कामगिरी करणाऱ्या सदस्यांना सन्मान चिन्हे देऊन गौरविण्यात आले. गरजू गरीब विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटपही समितीच्यावतीने यावेळी करण्यात आले.
हा जयंती महोत्सव यशस्वी करण्यासाठी समितीचे उपाध्यक्ष नरेश वाघमारे, सचिव प्रविण डोंगरदिवे, सहसचिव अजित न्यायनिर्गुणे, काषाध्यक्ष मंगेश येलवे, सदस्य वनिता कांबळे, मनिषा पवार, अमित साठे, विनोद वैदू आदिंनी विशेष परिश्रम घेतले.