‘कोमसाप’चे पुरस्कार जाहीर
74 जणांची निवड; पालघर येथे सहाव्या राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनात 11, 12 जून रोजी पुरस्कार वितरण
रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे वाङ्मयीन तसेच वाङ्मयेतर क्षेत्रातील योगदानासाठी दिल्या जाणार्या विविध पुरस्कारांच्या मानकर्यांची घोषणा करण्यात आली आहे. कोमसापकडून गेल्या तीन वर्षांतील 74 पुरस्कार्थींची निवड करण्यात आली आहे. 11 व 12 जून रोजी पालघर येथे होणार्या कोमसापच्या सहाव्या राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनाच्या समारोप समारंभावेळी विशेष कार्यक्रमात या पुरस्कारांचा वितरणसोहळा संपन्न होईल.
पुरस्कार घोषणांची यादी ‘कोमसाप’च्या केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर, कोमसापचे केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ आणि पालघर येथे होणार्या महिला साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष ज्योतीताई ठाकरे यांच्या उपस्थिती झाली आहे.
मराठी भाषा आणि साहित्याच्या प्रसारासाठी ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड प्रयत्नशील असणार्या कोमसापकडून गेल्या 25 वर्षांपासून वाङ्मयीन आणि वाङ्मयेतर क्षेत्रातील योगदानासाठी दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात. परंतु कोरोनाकाळातील निर्बंधांमुळे गेल्या दोन वर्षांत या पुरस्कारांचे वितरण शक्य झाले नाही. त्यामुळे आता कोरोनाचा झाकोळ दूर झाल्यानंतर कोमसापकडून सन 2018-19, 2019-20 आणि 2020-21 अशा गेल्या तीन वर्षांतील पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
यात कादंबरी, कथा, कविता, चरित्रपर, ललित, समीक्षा, वैचारिक, बालवाङ्मय आदी साहित्यप्रकारांतील उल्लेखनीय साहित्यकृतींद्वारे तसेच वाङ्मयीन व्यवहार, पर्यावरण, शिक्षण आदी क्षेत्रांत कृतिशील योगदान देणार्या तब्बल 74 पुरस्कार्थींचा समावेश आहे. प्रा. अशोक ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या पुरस्कार्थींची निवड केली आहे.