खड्ड्यामधील चिखलयुक्त पाणी शाळकरी मुलींवर उडल्याने त्यांनी स्वतः बुजविले रस्त्यातील खड्डे!
संगमेश्वर बाजारपेठेतील अमोल शेट्ये यांचे प्रसंगावधान
संगमेश्वर : सचिन यादव
शुक्रवारी येथील पैसा फंड हायस्कूल भरण्याची वेळ होत आली असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याची घाई होती. पाऊसही पडत होता. बाजारपेठेत अमोल शेट्ये यांच्या घरासमोरील रस्त्यावर एक खड्डा पडला होता. मुसळधार पावसामुळे तो खड्डा चिखलयुक्त पाण्याने भरला असल्याने वाहनचालकांना लक्षात आले नाही आणि त्याचवेळी शाळकरी विद्यार्थिनी त्याच रस्त्याने चालत आल्या आणि खड्ड्यातील चिखलाचे पाणी संपूर्ण चेहऱ्यावर उडाले. यात वाहनचालकाचा काही दोष नव्हता. पण मुलींकडे बघून अमोल शेट्ये यांना वाईट वाटले. मुलींपुढे दिवसभर चिखलाचे पाणी उडालेल्या कपड्यावरच काढण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यांना कपडे साफ करायला पाणी दिले. नंतर त्या शाळेत गेल्या.
संगमेश्वरमधील सामाजिक कार्यकर्ते अमोल शेट्ये यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तत्काळ दुपारी दोन्ही खड्डे भरून टाकले.परत कोणाच्याही चेहऱ्यावर पाणी उडू नये यासाठी त्यांनी प्रसंगावधान दाखवत स्वतःच खड्डे भरून टाकले.
अमोल शेट्ये यांनी दाखवलेल्या समयसुचकतेचे कौतुक होत आहे.