मुंबई -गोवा हामार्गावरील परशुराम घाटात तत्काळ संरक्षण भिंती उभारा
घाटाच्या सुरक्षेसाठी जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांचे संबंधित यंत्रणांना आदेश
रत्नागिरी : परशुराम घाटात दरड कोसळून हानी होवू नये, यासाठी सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. दरडीचा धोका राहू नये यासाठी उर्वरित बाजूनेही तत्काळ संरक्षण भिंत उभारण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पावले उचलावीत व प्रस्ताव सादर करुन तत्काळ काम सुरु करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी आज दिले.
या बाबत बुधवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे पेढे-परशुराम येथील गावकरी तसेच औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनिधी व संबंधित यंत्रणांची बैठक घेतली.
या ठिकाणी काही घरांवर दरड कोसळण्याचा धोका आहे असे नागरिकांचे म्हणणे होते त्या पार्श्वभूमीवर या सर्वांनी प्रसंगी स्थलांतरीत करण्यात यावे याबाबतही यावेळी चर्चा झाली.
घाटाच्या आतापर्यंत झालेल्या कामाचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. घाटाच्या एका बाजूने संरक्षण भिंत बांधून झाली आहे. दुसर्या बाजूनेही अशी भिंत उभारणी आवश्यक असल्याचे सांगून याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तत्काळ काम सुरु करावे असे जिल्हाधिकारी म्हणाले.
पावसाच्या काळात वाहनांवर दरड कोसळून अपघात होवू शकतो त्यामुळे अशावेळी प्रसंगी काही काळ वाहतूक थांबविण्याबाबत देखील यावेळी चर्चा झाली