रत्नागिरी सायकलिंग क्लबतर्फे २२ रोजी सायकल प्रसार फेरी
वाहतूक शाखा वरिष्ठ निरीक्षक शिरीष सासणे यांच्या हस्ते नवीन जर्सीचे अनावरण
रत्नागिरी : शहर परिसरात सातत्याने सायकलिंगचा प्रसार आणि प्रचार करणाऱ्या रत्नागिरी सायकलिंग क्लबतर्फे येत्या रविवारी 22 मे रोजी सकाळी 6 वाजता रत्नागिरी सायकलिंग क्लबतर्फे सायकल प्रसार फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर नवीन जर्सीचे अनावरण वाहतूक शाखा वरिष्ठ निरीक्षक श्री. शिरीष सासणे यांच्या हस्ते मारुती मंदिर येथे एका छोटेखानी समारंभात करण्यात आले.
यावेळी सासणे यांनी वाहतूक शाखेतर्फे सायकलिस्टना पूर्ण सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली तसेच सायकल चालवताना हेल्मेट सारखी सेफ्टी इक्विपमेंट परिधान करूनच सायकल चालवावी, असे आवाहन आपल्या मनोगतातून केले.
याप्रसंगी रत्नागिरी सायकलिंग क्लबचे सदस्य,वॉकर्स ग्रुप रत्नागिरी चे सदस्य तसेच रत्नागिरीतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्री.महेश गुंदेचा उपस्थित होते.पर्यावरणप्रेमी असलेल्या सायकलींग क्लब कडून झाडाची रोपे देऊन मान्यवरांच स्वागत करण्यात आलं .
या प्रसंगी रत्नागिरी सायकलींग क्लब तर्फे येत्या कॅलेंडर वर्षात 1 लाख किलोमीटर सायकलिंग करण्याचं उद्दिष्ट ठरविण्यात आलं.दर दोन महिन्यांनी एक मोठी 100 किलो मीटर ची ग्रुप राईड,दर 15 दिवसांनी एक 50 किलोमीटर ची ग्रुप राईड रत्नागिरी सायकलिंग क्लब तर्फे केली जाते.
दरम्यान, येत्या रविवारी 22 मे रोजी सकाळी 6 वाजता रत्नागिरी सायकलिंग क्लबतर्फे मारुती मंदिर -फिनोलेक्स कॉलनी-मिऱ्या- गाडीतळ -टिळक आळी -मांडवी-आठवडा बाजार-जयस्तंभ – माळनाका – मारुती मंदिर अशा शहरांतर्गत सायकल प्रसार फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
जास्तीत जास्त सायकलप्रेमींनी हेल्मेट आणि पाण्याची बाटली सोबत घेऊन या सायकल रॅलीमध्ये मारुती मंदिर येथे सकाळी 6 वाजता सहभागी व्हावे,
तसेच 14 वर्षाखालील सायकलप्रेमींनी आपल्या पालकांसह या रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन क्लब तर्फे करण्यात आले आहे.