विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास मातृभाषेतून शाळांमध्येच होतो : खासदार विनायक राऊत
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी या शाळा इमरतीचे उद्घाटन
रत्नागिरी : लहान वयामध्ये जर मुलांना त्यांच्या मातृभाषेमधून शिक्षण दिल्यास त्यांना शिक्षणामधील नवनवीन बदल हे आत्मसात करायला सोपे जाते व त्यामुळे त्याच्या शिक्षणाचा दर्जा उंचावत असतो. म्हणून प्रत्येक पालकाने या सध्याच्या युगात आपल्या मुलाला आपापल्या मातृभाषेतून शिक्षण दिले पाहिजे, असे मत रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केले.
ते रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी या शाळेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले की, पूर्वीच्या काळी कसल्याही पद्धतीची इंग्रजी वा इतर माध्यमाच्या शाळा किंवा इतर बोर्डांच्या सुद्धा शाळा नव्हत्या. तरीही आज समाजामध्ये अनेक जण आपापल्या पायावर स्वस्थपणे आणि परिपूर्णरित्या उभे आहेत. याची असंख्य उदाहरणे आपल्या परिसरात आढळतात. त्यामुळेच एखाद्या ठराविक माध्यमातून शिक्षण घेतल्यास मुलांचा सर्वांगीण विकास होतो हा समज प्रत्येक पालकांनी काढून टाकून प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेतच घातले पाहिजे. आपल्या जिल्ह्यात अनेक शाळा ह्या शंभर ते दीडशे वर्षाच्या असून या सर्व शाळांचा खुप अभिमान वाटतो. म्हणूनच हे वैभव टिकविण्यासाठी पालक, ग्रामस्थ यांनी एकत्र येत शिक्षकांच्या मदतीने अनेक उपक्रम राबवून विद्यार्थी घडवावे असे आवाहन त्यांनी केले.
रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी या शाळेला स्थापनेपासून एकसष्ट वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शाळेची एकसष्टी साजरी करण्यात आली. या एकसष्टी च्या निमित्ताने शाळेचा जीर्णोद्धार सोहळा नुकताच अतिशय उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक रवींद्र तथा अण्णा सामंत यांनी श्रीफळ वाढवून शाळेचे उद्घाटन केले. त्यानंतर नव्याने बांधण्यात आलेल्या ऑफिस आणि संगणक कक्षाचे उद्घाटन मान्यवरांच्या प्रमुख हस्ते झाले. त्यानंतर सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रसिद्ध उद्योजक अण्णा सामंत, खा. विनायक राऊत, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक गजानन पाटील, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रकाश साळवी, बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर सागर चव्हाण, रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती संजना माने, माजी सभापती ऋतुजा जाधव, माजी सभापती मेघना पाष्टे, ग्रुप ग्रामपंचायत वाटद सरपंच अंजली विभुते यांच्यासह माजी समाजकल्याण समिती सभापती शरद चव्हाण, क्रीडा शिक्षक राजेश जाधव, सामाजिक कार्यकर्ते उदय माने, राजेश साळवी, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भाई जाधव, माजी सरपंच अनिकेत सुर्वे, प्रशांत घोसाळे, उपस्थित होते.