वीज निर्मिती राहिली बाजूला, रत्नागिरी गॅस प्रकल्प प्रशासन करतंय मत्स्यशेती!
एकीकडे कौतुक तर दुसरीकडे टीका
गुहागर : वापरात नसलेल्या जलतरण तलावात मत्स्यशेतीचा प्रयोग रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पातील (पूर्वीचा एनरॉन प्रकल्प) कर्मचाऱ्यांनी यशस्वी केला आहे. तिलापिया माशांचे उत्पादन कंपनीने घेतले आहे. सध्या कंपनीच्या प्रयोगाचे कौतुक होत असले तरी आरजीपीएलचे नेमके उद्दीष्ट काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
स्थानिकांना बेरोजगार करुन एनटीपीसीचे अधिकारी मत्स्यपालना दंग आहेत. कंपनी प्रशासनाने मत्स्यपालन करण्यापेक्षा कंपनी कायमस्वरूपी सुरु राहण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी टिका होत आहे.
कंपनीच्या परिसरातील एक जलतरण तलाव कित्येक वर्ष वापराविना पडून होता. स्थापत्य विभागाच्या कर्मचाऱ्यांतर्फे त्यांची देखभाल ठेवली जात असे. सामंता यांनी या विभागाला जलतरण तलावात मत्स्यशेतीचा प्रयोग करण्याची विनंती केली. मत्स्यशेती तज्ज्ञ डॉ. श्रीधर देशमुख यांची या प्रयोगासाठी मदत घेण्यात आली. 1 डिसेंबर 2021 रोजी तिलापिया जातीच्या माशांचे 2000 मत्स्यबीज या तलावात सोडण्यात आले. डॉ. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापत्य विभागाचे काही कर्मचारी मत्सखाद्य पुरवणे, तलाव स्वच्छ राहील असे पहाणे, तलावातील पाणी बदलणे आदी कामे करत होते. गेल्या सहा महिन्यात उत्पादन योग्य माशांची वाढ तलावात झाली आहे.
गेल्या दोन वर्षात आरजीपीपीएलद्वारे अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. त्यांना प्रसिध्दी दिली जात आहे. मात्र त्याचवेळी आरजीपीपीएलमधील स्थानिकांना बेरोजगार केले जाते. त्यातही निवासी वसाहतीमध्ये काम करणाऱ्यांना नोकरी आणि प्रकल्पात काम करणाऱ्यांना सुट्टी दिली जाते. आज कंपनीच्या स्थापनेपासून कार्यालयीन कामकाज पहाणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरी बसवल्यामुळे व्यवस्थापन कार्यात अडथळे येत आहेत. ठेकेदारांना वेळवर बिले मिळत नाहीत. फाईल सापडत नाहीत. कंपनीची संगणकीय प्रणाली मध्यंतरी हॅक झाल्यानंतर पुन्हा सर्व गोष्टी सुस्थितीत आलेल्या नाहीत. अशा पार्श्र्वभुमीवर कंपनी शौचालय बांधते पण पाण्याची व्यवस्था करत नाही. चुकीच्या ठिकाणी बसस्टॉप बांधुन पैसे खर्च केले जात आहेत. स्वच्छता, प्लास्टीकमुक्त भारत यांचे उपक्रम राबविले जातात. प्रकल्प सुरु नसताना रेन हार्वेस्टींग करुन पाणी साठवले जात आहे. कंपनीतील रेन हार्वेस्टींगचा तोटा अंजनवेल गावाला होतो हे अधिकाऱ्यांच्या लक्षातच येत नाही. आता मत्स्यशेतीचा उपक्रम कंपनीने केला आहे.
प्रत्यक्षात कंपनी व्यवस्थापनाने वीज प्रकल्प कायम सुरु राहील यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. स्थानिकांना वीज प्रकल्पात कायमस्वरुपी रोजगार मिळण्यासाठी कंपनीने कटीबद्ध असले पाहीजे. प्रकल्पासाठी आवश्यक अभ्यासक्रम शासनाद्वारे आयटीआयमध्ये राबविले तर स्थानिकांना कंपनीत काम मिळेल. ठेकेदारी स्वरुपात कामे देताना स्थानिकांना प्राधान्य, कंपनीला लागणाऱ्या विविध वस्तु, पदार्थांची दुकाने थाटण्यासाठी कंपनी परिसरात मोफत जागा दिली. तर येथील आर्थिक स्थिती सुधारेल. मात्र ही कर्तव्ये विसरुन कंपनी भलत्याच गोष्टीत ताकद खर्च करुन स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे. स्थानिकांशिवाय कंपनी चालविण्याचे धोरण आखत आहे.