रत्नागिरीतील चंपक मैदानाजवळ लखनौमधील वृद्धासह एकाला LCB कडून अटक
रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्यासारख्या दराने विकल्या जाणाऱ्या व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या टोळीतील दोघांना रत्नागिरी येथे गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांना यश आले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील बाजारभावा प्रमाणे सुमारे ६ कोटी रुपये किमंतीची पावणेसहा किलो वजनाची उलटी शहरानजिकच्या उद्यमनगर चंपक मैदानाजवळ जप्त करण्यात आली आहे. यामध्ये लखनौमधील एका व्यक्तीसह एका स्थानिकाला पोलीसांनी अटक केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांना त्याच्या खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळी उद्यमनगरनजिकच्या चंपक मैदानाजवळ दोघेजण व्हेल माशांच्या उलटीची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी चंपक मैदानशेजारी सापळा रचला होता. सोमवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरुन दोनजण घटनास्थळी आले. काही वेळ ते कोणाची तरी वाट पहात थांबले होते. याच वेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी दोघांना ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरु केली. त्यानंतर त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीच्या डिक्कीत सुमारे पावणेसहा किलो वजनाच्या व्हेल माशाच्या उलटीचे पांढऱ्या रंगाचे तुकडे आढळून आले. त्यानंतर त्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी ताब्यात घेतले.
व्हेलमाशाची उलटी म्हणजे अॅम्बरगिस हे हलक्या राखाडी किंवा काळ्या रंगाचे असते. तो मेणासारखा एक दगडसदृश्य पदार्थ असतो. व्हेल माशाने तो तोंडातून बाहेर फेकला की तो वाहत किनाऱ्यावर येतो. सुगंधी द्रव्ये, सुगंधी अत्तर, बॉडी स्प्रे, परफ्युम आणि अनेक औषधे तयार करण्यासाठी ते वापरले जाते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ते सोन्यासारख्या महाग किंमतीने विकले जाते. त्यामुळ अनेक ठिकाणी त्याची तस्करी करुन छुप्या पद्धतीने खरेदी‚ विक्री होत असल्याचे प्रकार उघडकीस येतात.
या प्रकरणी पोलीसांनी महम्मद जाहिर सय्यद महम्मद अत्तार (वय ५६, रा. सध्या राजापूरकर कॉलनी, उद्यमनगर, मूळ लखनौ), हमीब सोलकर ( रा. लाला कॉम्प्लेक्स, रत्नागिरी) या दोघांना अटक करुन त्यांच्या विरुद्ध ग्रामीण पोलीस स्थानकात वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक तपास ग्रामीण पोलीस स्थानकाचे सहय्यक पोलीस उपनिरिक्षक महेश टेंमकर करित आहेत.
पोलीस अधिक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, अप्पर पोलीस अधीक्षक सौ.जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक व त्यांच्या सहका ऱ्यानी ही कारवाई केली.