‘अग्निपथ’ योजनेविरोधात प्रदेश काँग्रेसचा राज्यभर सत्याग्रह.
मुंबई : केंद्र सरकार देशातील तरुणांना देशोधडीला लावण्याचे काम करत असून लष्करात कंत्राटी पद्धतीने भरती करण्याच्या सरकारच्या निर्णयाला तरुणांसह काँग्रेस पक्षाच तीव्र विरोध आहे. अग्नीपथ योजना आणून देशसेवेच्या व्रताला काळीमा फासण्याचे आणि बेरोजगार तरुणांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम भाजपा सरकार करीत आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, अग्निपथ योजना ही सैन्यदलात भरती होऊन देशसेवा करु पाहणाऱ्या तरुणांचे स्वप्न धुळीस मिळवणारी आहे. या योजनेला तरुणांचा तीव्र विरोध असून काँग्रेस पक्ष तरुणांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. ही योजना देशाच्या सुरक्षेशी तडजोड करणारी आहे तसेच चार वर्ष नोकरी केल्यानंतर या जवानांना पुन्हा नोकरीसाठी भटकावे लागणार आहे. जवानांचा असा अपमान काँग्रेसला कदापी सहन होणार नाही. ही योजना रद्द करावी या मागणीसाठी प्रदेश काँग्रेसने राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात सत्याग्रह केला. या आंदोलनात काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, बेरोजगार तरुण यांच्यासह सामान्य जनतेनेही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.
कोल्हापूर, पुणे, नाशिक, लातूर, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, सिंदखेडराजा, करवीर, राजुरासह सर्व भागात आंदोलन करण्यात आले.