अणुस्कुरा घाटातून वाहतूक सुरळीत
कोकणला पश्चिम महाराष्ट्राशी कमी अंतराने जोडणारा घाट मार्ग
राजापूर : राजापूरला कोल्हापूरशी जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटात रविवारी पहाटेच्या सुमारास कोसळलेली दरड बाजूला केल्यानंतर रविवारी दुपारनंतर वाहतूक सुरळीत करण्यात बांधकाम खात्याला यश आले आहे.
कोकणला कोल्हापूरशी जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटात या आठवड्याभरात दोन वेळा दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. गेले काही दिवस कोकणात मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे या घाटात दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास या घाटात दरड कोसळल्या नंतर वाहतूक विस्कळीत झाली.
या घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम खात्याने आधी एकेरी वाहतूक सुरू केली तर दुपारच्या सुमारास घाटातील दरड पूर्णपणे बाजूला केल्यानंतर राजापूर तालुक्यातून कोल्हापूरकडे होणारी वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. कोकणातून पश्चिम महाराष्ट्राकडे कमी अंतरातील रस्त्याने जाण्यासाठी या घाटाचा उपयोग केला जातो. मात्र अलीकडच्या काही वर्षात पावसाळ्यात या घाट मार्गावर दरडी कोसळून वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले आहे.