अतिवृष्टीमुळे घर कोसळून मृत्यू झालेल्या कातकरी कुटुंबियाला महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकरांकडून आर्थिक मदत
उरण (विठ्ठल ममताबादे ) : जांभूळ पाडा कातकरी वाडी, उरण, जिल्हा रायगड येथील राम कातकरी याचा अतिवृष्टीमुळे अंगावर घर कोसळून मृत्यु झाला आणि त्याच्या बायकोला हाता पायाला दुखापत झाल्याचे समजताच सामाजिक कार्यकर्ते तथा महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर यांनी कातकरी कुटुंबियांना मदतीचा हात दिला असून सामाजिक बांधिलकी जपत दहा हजाराची मदत राजू मुंबईकर यांनी सुमन राम कातकरी यांच्या हातात सुपूर्द केली.
दिनांक 11/7/2022 रोजी उरण तालुक्यात जोरात, मुसळधार पाऊस पडत होता. वादळवाराही जोरात सुरु होता. त्यातच रात्री 2 वाजता आदिवासी वाडीतील घर कोसळून राम कातकरी याचा मृत्यू झाला आहे.4 मुले, आई वडील व नवरा बायको असा त्यांचा कुटुंब आहे.लाकडे गोळा करून तसेच मोल मजुरी करून हे कुटुंब जगत होते. या पीडित कुटुंबाला मदत करून राजू मुंबईकरांनी त्यांचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला. नातेवाईकांचे सांत्वन केले.
अत्यंत हालाखीत, वाईट परिस्थितीत जगणाऱ्या या पीडित कुटुंबाला शासकीय मदतनिधी मिळावी अशी अपेक्षा महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर यांनी व्यक्त केली आहे.समाजातील दानशूर व्यक्तींनीही पुढे येऊन पीडित कुटुंबास मदत करावे, असे नम्र आवाहन राजू मुंबईकर यांनी केले आहे.