अनिल परब यांच्या कथित रिसॉर्ट प्रकरणी उशिरापर्यंत सुरू होती ईडीची चौकशी
दापोली : अनिल परब यांच्यावर गुरुवारी ईडीने सुरू केलेल्या चौकशीचा भाग म्हणून रत्नागिरी जिल्हयात दापोली येथेही ईडीचे पथक दाखल झाले होते.भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलेली तक्रार व केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या कारवाईनंतर दापोली तालुक्यातील मुरुड साई रिसाँर्ट चर्चेत आले. याच रिसॉर्टमध्ये इडीचे अधिकारी चौकशीसाठी गुरुवारी सकाळी ६.३० वाजता दाखल झाले होते. ईडीच्या या कारवाईने जिल्हयातच नव्हे तर राज्यात खळबळ उडाली आहे.सकाळपासून सुरू झालेली चौकशी रात्री उशिरा जवळपास ९:४५ वा. पर्यंत ही चौकशी साई रिसॉर्टवर सुरू होती. दरम्यान मुरूड येथील या साई रिसॉर्टजवळ आपला कोणताही संबंध नसल्याचे अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे.
राज्याचे परिवहन मंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्याशी सबंधित ७ ठिकाणी आज इडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जात आहे. याच कारवाईचा एक भाग म्हणून इडीच्या मुंबई येथील कार्यालयातील ३ अधिकाऱ्यांचे पथक मुरुड येथील साई रिसाँर्ट येथे आले आहे.
विभास साठे यांचेकडून अनिल परब यांनी दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनाऱ्याला लागून असलेली जागा खरेदी केली होती, काही दिवसांनी अनिल परब यांनी हि जागा त्यांचे निकटवर्तीय खेड येथील सदानंद कदम यांनी विकली होती, त्यावर सदानंद कदम यांनी अलिशान असे साई रिसाँर्ट बांधले आहे. हे रिसाँर्ट बांधताना सीआरझेड कायद्याचा भंग करण्यात आल्याची तक्रार भाजपचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केंद्रीय वन, पर्यावरण मंत्रालयाकडे केली होती या तक्रारीनुसार पर्यावरण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यानी मुरुड येथे येवून पाहणी केली होती व पर्यावरण मंत्रालयाला अहवाल सदर केला होता त्यानुसार पर्यावरण कायद्याचा
भंग करून बांधण्यात आलेले हे साई रिसाँर्ट तोडून टाकावे असे आदेश पर्यावरण मंत्रालयाने दिले होते,तसेच दापोली न्यायालयात या संदर्भात एक खटलाही दाखल केला आहे.
परिवहन मंत्री अनिल परब यांनी मुरुड येथील हि जागा उद्योजक सदानंद कदम यांना विकलेली असली तरी त्यात अनिल परब यांचे हितसंबंध असल्याचे आरोप किरीट सोमय्या यांनी वारंवार केले आहेत. मध्यंतरी आयकर विभागाने केलेल्या चौकशीत साई रिसॉर्ट बांधण्यासाठी केलेल्या खर्चाबाबतही माहिती घेतली होती, त्यानंतर आज मंत्री अनिल परब यांचेशी संबंधित ठिकाणी इडीच्या अधिकाऱ्यानी छापे मारले आहेत.
मात्र साई रिसाँर्ट मुरुड येथे कोणताही पोलीस बंदोबस्त आढळून आला नाही असे असले तरी सकाळी ६.३० वाजताच या चौकशीला सुरवात झाली होती.पण मुरुड येथील अनेकांना अधिकारी चौकशीला आले असल्याची माहिती नव्हती.आता या चौकशी दरम्यान नेमकी काय व कोणती माहिती हाती लागली किंवा कसे ?याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागुन राहिल आहे. ज्यांनी जमीन विकली ते पुर्वीचे मूळ जमीन मालक विभास साठे यांचीही पुण्यात ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे.