अमरनाथ ढगफुटी दुर्घटनेत पुण्याच्या सुनिता भोसले यांचा मृत्यू
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर मधील अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी सदृश्य पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत पुणे (धायरी) येथील सुनिता महेश भोसले (५२ वर्षे) यांचा मृत्यू झाला असून रविवारी दिल्लीत त्यांचे पार्थिव शरीर आणण्यात आले. महाराष्ट्र सदनामार्फत सोमवारी पहाटेच्या विमानाने हे पार्थिव पुण्यात पाठविण्यात येणार असल्याची माहिती निवासी आयुक्त कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.
अमरनाथ गुहेजवळ ८ जुलै २०२२ रोजी सायंकाळी दुर्घटना घडली. देशाच्या विविध भागातून अमरनाथ यात्रेसाठी आलेल्या काही भाविकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला तर काही भावीक जखमी झाले आहेत. दरम्यान, श्रीनगर जिल्हा प्रशासन व दिल्लीतील जम्मू काश्मीर भवनाकडून आज येथील महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधून सुनिता भोसले यांचे पार्थिव दिल्लीला पाठविण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तसेच, हे पार्थिव पुणे येथे पाठविण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, महाराष्ट्र सदनाने महाराष्ट्र शासनाच्यावतीने उचित कार्यवाही करून पार्थिव पाठविण्याची व्यवस्था केली आहे. या संदर्भांत पुणे जिल्हाधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली असून सोमवारी पहाटे ५ वाजताच्या खाजगी विमानाने हे पार्थिव पुण्याला पाठविण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र सदनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.