ई-श्रम पोर्टलवर मत्स्य कामगारांची नोंदणी अनिवार्य
रत्नागिरी दि. 03 : केंद्र सरकारच्या कामगार आणि रोजगार विभागाच्या पोर्टलवर देशातील असंघटीत कामगारांना सामाजिक सुरक्षा फायदे देण्याच्या अनुषंगाने सुरु करण्यात आलेल्या ई-श्रम पोर्टलवर मासेमारी करणारे, मत्स्य विक्रेते व मत्स्यव्यवसाय संबधित कामांमध्ये थेट सहभागी असलेल्या कामगारांची नोंदणी करणे आवश्यक आहे. तरी https://register.eshram.gov.in या पोर्टलवर जाऊन मस्त्य व्यवसायाशी संबधित मजुरांचे आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक, बँक पासबुक इत्यादी माहितीसह मत्स्य कामगारांची या पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन सहाय्यक
आयुक्त, मत्सयव्यवसाय, रत्नागिरी ना.वि. भादुले यांनी केले आहे.
या पोर्टलवर नोंदणी झाल्यास मत्स्यव्यवसायाशी संबधित व्यक्तींना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत अपघाती मृत्यूनंतर 2 लाख व कायमचे अपंगत्व आल्यास एक लाख रुपये मदत देणे शक्य होईल. तसेच या माध्यमातून असंघटीत मजुरांना सामाजिक सुरक्षेचा लाभ देणे शक्य होणार आहे. अचानक उद्भवणाऱ्या आणि राष्ट्रीय महामारीसारख्या परिस्थितीत मदत वितरीत करतानाही ही माहिती कामी येणार आहे. पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी संबधित व्यक्तीची वयोमर्यादा 16 ते 59 वर्षे इतकी आवश्यक आहे.
या व्यक्ती, कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे (EPFO) सभासद नसावेत, कोणत्याही शासकीय वा निमशासकीय सेवेत नसावे. जिल्हयातील मत्स्यकास्तकार स्वत: या पोर्टलवर नोंदणी करु शकतात अथवा जवळच्या आपले सेवा केंद्र येथे नोंदणी करु शकतात. यासंदर्भात अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रत्नागिरी कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागामार्फत करण्यात येत आहे.