https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

उद्योगमंत्री आणि आता पालकमंत्रीपदी ना. उदय सामंत यांची नियुक्ती राजापूरसाठी भाग्योदय : महेश शिवलकर

0 86

राजापूर : राज्यात सत्तांतर होताच राजापुरातील रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या पूर्तता प्रक्रियेने वेग घेतला आहे. पालकमंत्रीपदी रत्नागिरी जिल्ह्याचेच सुपुत्र उदय सामंत यांची झालेली नियुक्ती ही राजापूरवासीयांसाठी भाग्योदय ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया तालुक्यातील 55 संघटनांचे प्रतिनिधित्व करणार्‍या रिफायनरी प्रकल्प समन्वय समिती या शिखर समितीचे कार्याध्यक्ष महेश शिवलकर यांनी व्यक्त केली आहे.
एमआयडीसीने आता प्रकल्पाबाबत जे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत किंबहुना प्रकल्पाबाबत जे गैरसमज पसरवत आहेत व देशातील शास्त्रज्ञ तसेच नवनव्या तंत्रज्ञानाला जे आव्हान देत आहेत त्यांचा कायदेशीर बंदोबस्त केला पाहिजे अशी प्रतिक्रिया तालुक्यातील 55 संघटनांचे प्रतिनिधित्व करणार्‍या रिफायनरी प्रकल्प समन्वय समिती या शिखर समितीचे कार्याध्यक्ष महेश शिवलकर यांनी व्यक्त केली आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने जो थयथयाट दाखवला जात आहे व राज्यातील रोजगार बाहेर जात असल्याचा गळा काढला जात आहे ते पाहता या राजकीय पक्षांनी रिफायनरी प्रकल्पाबाबत केलेले नकारार्थी राजकारण नेमके तपासण्याची गरज असल्याचे समन्वय समितीचे मत आहे.
सोयीस्कर राजकारण करणारे राजकीय पक्ष गुजरातमध्ये चांगले प्रकल्प आणि महाराष्ट्रात प्रदूषणकारी प्रकल्प असाही एक युक्तीवाद करीत आहेत. मात्र, मुळात गुजरातमध्ये चार रिफायनरी प्रकल्प पूर्वीच कार्यान्वित असून देशातील 41 टक्के क्रूड ऑईल प्रोसेसिंग एकट्या गुजरातमध्ये होत आहे. बार्रोनी, जामनगर, वडिनार, आणि गुजरात रिफायनरीमुळे गुजरातचा कायापालट होण्यास मदत झाली. गुजरातच्या एकंदरित विकासात रिफायनरीजचा वाटा मोठा आहे, हे सिध्द् झाले आहे मात्र राजकीय पक्षांना हे माहिती नसावे, हे अनाकलनीय असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाचा विषय राज्यात सत्तांतर होताच शीघ्र वेगाने पुढे आला आहे ते पाहता राज्यातील शिंदे सरकारबद्दल स्वाभाविकच हजारो प्रकल्पसमर्थकांत सहानुभूती निर्माण झाली आहे. त्यात उद्योगमंत्रीपदी व पालकमंत्रीपदी उदय सामंत यांची झालेली नियुक्ती ही अवघ्या कोकणच्या प्रगतीची नांदी आहे असे शिवलकर यांनी सांगितले.
गेली अनेक वर्षे ज्या समित्या स्वयंप्रेरणेने केवळ राजापूर तालुक्याचा विकास या मुद्द्यावर एकत्र येत रिफायनरीच्या समर्थनार्थ पुढे सरसावल्या आहेत त्या समित्यांशी एमआयडीसीने अद्यापपर्यंत साधा संपर्क साधलेला नाही तर दुसरीकडे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्थानिकांचे गैरसमज दूर करणार, त्यांचे प्रबोधन करणार अशा भूमिका जाहीर केल्या आहेत. मात्र, सद्याच्या एमआयडीसी अधिकार्‍यांची त्रयस्थ वागणुक पाहता हे मोठे आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले. रिफायनरी प्रकल्प समन्वय समिती ही केवळ राजापूर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने गठीत झालेली आहे. त्यामुळे बारसू-धोपेश्वरमधील स्थानिक शेतकरी जे पारंपारिक पध्दतीने तेथील मुळ भूमिपुत्र आहेत त्यांच्या हितासाठी समिती बांधील आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.