उरणच्या विविध समस्यांबाबत उच्चस्तरीय समन्वय समिती पुनरुज्जीवित करा
उरण सामाजिक संस्थेची पालक मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे मागणी
उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यात जवाहरलाल नेहरू बंदर हे देशातील सर्वात मोठे कंटेनर हाताळणारे बंदर आहे. या बंदराच्या 10 ते 12 किलोमीटरच्या परिघात रोज 20 ते 25 हजार कंटेनर आणि इतर जड वाहनांची प्रचंड वाहतूक सुरू असते.परंतु त्या प्रमाणात रस्ते आणि ईतर पायाभूत सुविधांच्या अभावामुळे या विभागात रोज जीवघेणे अपघात होत असतात. त्यामुळे आजपर्यंत 800 हून अधिक नागरिकांना आपले जीव गमवावे लागले असून अनेक जण शारीरिक दृष्ट्या जायबंदी झाले आहेत.
उरण तालुक्यात कोणतेही शासकीय सुसज्ज असे रुग्णालय नसल्याने ही समस्या अधिकच गंभीर बनली आहे. वाहतूक कोंडीमुळे येथील जनता त्रस्त झाली आहे. याच पार्श्वभूमीवर उरण सामाजिक संस्थेने फेब्रुवारी 2013 मध्ये तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले होते. त्यांच्याच मदतीने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली संबंधित खात्याचे अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय समन्वय समिती स्थापन होऊन पहिली बैठक 13 /5/ 2013 रोजी मंत्रालयात संपन्न झाली. सदर बैठकीत मंजूर झालेल्या 16 मुद्यांचा पाठपुरावा करण्यासाठी समन्वय समितीच्या दोन बैठका जुलै आणि ऑगस्ट 2013 मध्ये घेण्यात आल्या होत्या. परंतु नंतर सरकार मध्ये बदल झाल्यानंतर सदर समन्वय समितीचे कामकाज मागील आठ वर्षांपासून स्थगित झाले आहे.आता महाआघाडीचे सरकार आल्याने सदर समन्वय समितीचे कामकाज पुन्हा सुरू करावी अशी मागणी उरण सामाजिक संस्थेने रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आदितीताई तटकरे यांच्याकडे केली आहे.
उरण तालुक्यात जेएनपीटी सह ओएनजीसी, बीपीसीएल, मोठे मोठे सी एफ एस, इतर प्रकल्प आहेत. या प्रकल्पांचा सी एस आर फंड स्थानिक जनतेच्या कल्याणासाठी वापरण्यात यावे.100 बेडचे सुसज्ज हॉस्पिटल करिता महाराष्ट्र शासनाकडून सद्यस्थितीत जो निधी मंजूर झाला आहे त्या अनुषंगाने भूमिपूजनाचा कार्यक्रम लवकरात लवकर व्हावा.त्या दृष्टीने युद्ध पातळीवर प्रयत्न व्हावेत. अशी मागणी पत्रव्यवहाराद्वारे उरण सामाजिक संस्थेने पालकमंत्री आदितीताई तटकरे यांच्याकडे केली आहे.