उरण दि 13(विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुका औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाचा तालुका समाजला जातो.अनेक विविध प्रकारचे विकासकामे येथे जोरात चालू आहेत.विकासाची कामे प्रगतीपथावर आहेत. मात्र हे विकास नागरिकांच्या विकासाला अडथळा आणत असल्याचे चित्र दिसत आहे. उरण पनवेल मुख्य रस्त्यावर फुंडे हायस्कूल, बोकडविरा, कोटगाव येथे बॅरिकेट्स चॅनेल (लोखंडी कमान )लावून अवजड वाहनांना बंदी आणली गेली आहे.कोणतेही अवजड वाहनांना आता या रस्त्यावरून प्रवास करता येणार नाही. मात्र सार्वजनिक विभागाने सदर ठिकाणी लोखंडी कमान (बॅरिकेट्स चॅनेल )लावण्याचा निर्णयावर बोकडविरा, कोटगाव, फुंडे, डोंगरी, पाणजे गावातील नागरिक नाराज असून सदर बॅरिकेट्स चॅनेल काढले नाही तर सदर गावच्या ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा प्रशासनाला दिला आहे.



उरणमध्ये रेल्वे स्टेशन होत आहे. तसेच सिडकोने विकसित केलेले द्रोणागिरी नोड या परिसरात बाहेरून नागरिक मोठ्या प्रमाणात राहण्यासाठी येत आहेत.सिडको प्रशासनाने व सार्वजनिक बांधकाम विभागाने द्रोणागिरी नोड परिसरातील विकासासाठी व बिल्डर लॉबीला खुश करण्यासाठी बोकडविरा, कोटगाव, फुंडे, डोंगरी, पाणजे गावालागत अवजड वाहनांना प्रवेश बंदी म्हणून बॅरिकेट्स चॅनेल लावले आहेत. मात्र हे बॅरिकेट्स चॅनेल लावल्याने जड वाहनासोबतच महामंडळचे बसेस, मोठ्या खाजगी बसेस, शासकीय मोठे वाहने ऍम्ब्युलन्ससह इतर वाहनांना येथून प्रवास करता येत नाही. महत्वाची वाहने सदर गावात पोहोचू शकत नाहीत. बोकडविरा, डोंगरी, फुंडे,पाणजे,कोटगाव या गावांना गावात घरे, बिल्डिंग बांधण्यासाठी खडे, माती रेती वीट, लोखंडी तारा, शिगे लागतात हे साहित्य जड वाहनातूनच सदर गावात न्यावी लागतात. आता मात्र गावच्या वेशीवर, प्रवेशद्वारा जवळच प्रशासनाने बॅरिकेट्स चॅनेल बसविल्याने जड वाहनांना, मटेरियल नेणाऱ्या वाहनांना गावात जाता येत नाही. बॅरिकेट्स चॅनेल मुळे गावातील महत्वाच्या वस्तू, सामान बाहेर नेता येत नाही. किंवा बाहेरून गावात मागविता येत नाही.सदर गावात बिल्डिंग मटेरियल किंवा अन्य महत्वाची वस्तू न्यायची असेल तर दुसऱ्या मार्गाने म्हणजेच भेंडखळ द्रोणागिरी नोड मार्गे जाऊन बोकडविरा, कोटगाव, फुंडे,पाणजे,डोंगरी गावात जावे लागत आहे. दुसऱ्या मार्गाने गावात वाहने दाखल होत असल्याने वाहन चालकांचा जास्त वेळ व श्रम खर्च होत आहे. शिवाय ज्यांच्या घराचे बांधकाम चालू आहे किंवा इमारतीचे बांधकाम चालू आहे त्यांना खडी, रेती, सिमेंट,लोखंडी तारा,शिगे या मटेरियलसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहे. गावांच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ तसेच उरण पनवेल मुख्य रस्त्यावर लावलेल्या बॅरिकेट्स चॅनेल मुळे बोकडविरा, कोटगाव, फुंडे, डोंगरी या गावांचा विकास खुटणार आहे. गावाच्या विकासाला खिळ बसणार आहे.शिवाय अवजड वाहणासाठी लावलेल्या या बॅरिकेट्स चॅनेलमुळे अनेक अपघात होत आहेत.सर्वात महत्वाचे म्हणजे सदर गावात कुठे अचानक आग लागली तर अग्निशमन दलाचे वाहन बॅरिकेट्स चॅनेल मुळे त्या आग लागलेल्या ठिकाणी जाऊ शकत नाही. या अशा घटनेमुळे जीवितहानी होऊ शकते. त्यासाठी यावर अगोदरच उपाययोजना करायला हवा.त्यामुळे सदर बॅरिकेट्स चॅनेल 15 दिवसाच्या आत त्वरित हटवावीत अन्यथा कोटगाव ग्रामसुधारणा मंडळ व स्थानिक रेल्वे प्रकल्पग्रस्त कृती सेवा संस्था उरण कोट या संघटनेतर्फे तसेच बोकडवीरा, कोटनाका, फुंडे, डोंगरी, पाणजे गावातील ग्रामस्थांतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.