काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष हारीस शेकासन यांचा आरोप
रत्नागिरी : रत्नागिरी शहरात ६७ कोटी रुपये खर्च करून राबविण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतून शहरवासीयांना मुबलक पाणी मिळत नाही. याचे गुपित कामा दरम्यान लाटलेल्या मलिद्यामध्ये आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष हारीस शेकासन यांनी केला आहे.
आधीच काळ्या यादीत टाकलेल्या ठेकेदाराची या कामासाठी नियुक्ती करुन काम सुरु होण्यापूर्वीच नगर परिषदेतील सत्ताधाऱ्यानी नळ पाणी पुरवठा योजनेत भ्रष्टाचाराची मुहुर्तमेढ रोवली. त्यामुळे या योजनेचे काम निकृष्ठ होणार हे निश्चित झाले होते, असेही शेकासन यांनी सांगितले. या कामावरून अनेकदा नगर परिषदेच्य झालेल्या सभांमध्ये विरोधकानी जोरदार हंगामा केला होता. मात्र, तो दिखाव्यापुरता असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण, हे काम निकृष्ट दर्जाचे झालेले असतानाही नगर परिषदेतील विरोधी पक्षाचे नगर सेवक मौन का होते ? विरोधक गप्प बसून शहरवासियांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत, असेही त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, नळ पाणीपुरवठा योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्यानेच व निकृष्ट दर्जाची सामग्री वापरल्याने पाण्याचे पाईप जागोजागी फुटून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. तसेच शहरातील बहुतांश भागांना पाणी कमी मिळत आहे. या योजनेचे काम दर्जाहीन असून या कामाचे ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी शेकासन यांनी केली आहे.