खेडच्या जगबुडी नदीने ओलांडली इशारा पातळी
खेड : तालुक्यात शुक्रवारपासून पावसाच्या दमदार सरी कोसळत असून शनिवारी दि ६ रोजी जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे जनजीवन प्रभावित झाले असून गेल्या आठ दिवसांपासून सतत हवामान बदलत असल्याने साथीचे आजार पसरत आहेत.खेड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार पावसाचे आगमन झाले आहे.
गेल्या चोवीस तासांत खेड मध्ये ३३ मिलीमीटर एव्हडी पावसाची नोंद झाली आहे. या वर्षी एकूण १६४४ मिलीमीटर एव्हडी पावसाची नोंद तालुक्यात झाली आहे. गेल्या चोवीस तासांपासून पावसाच्या सरी कोसळत असल्याने जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. शनिवारी दि ६ रोजी दुपारी जगबुडी नदीतील पाण्याची पातळी ५.२० मीटर एवढी झाली असून गेल्या काही दिवसांपासून ऊन व पावसाचा सुरू असलेला खेळ थांबला आहे. हवामान अचानक बदलल्याने साथीचे आजार पसरत आहेत. शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात ताप, सर्दी व अन्य आजारांनी नागरिक त्रस्त झाले आहेत.